
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. राष्ट्रीय नेत्यांचे दौरे राज्याच्या विविध भागात आयोजित करून 200 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर तृणमूल कॉँग्रेसच्या नेत्या व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपने केवळ 30 जागा जिंकून दाखवाव्यात, असे आव्हान दिले आहे.
प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही दिवसांपूर्वी रोड शो केला होता. त्याच ठिकाणी पदयात्रा काढत निवडणुकीचे रणशिंग फुंकले. यानंतर संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी तृणमूलचे काही आमदार खरेदी केल्याने तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडेल, असा कयास भाजप करत आहे. मात्र, असे काहीही होणार नाही. भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाला आपला पक्ष पुरून उरेल असे सांगत प. बंगालच्या सत्तेची स्वप्न पाहणाऱयांनी 30 तरी जागा जिंकून दाखवाव्यात असं आव्हान दिलं. विधानसभा निवडणुकीचा कालावधी जवळ येतोय तसे भाजप नेते दर आठवडय़ाला येथे येऊन मुक्काम करत आहेत. मात्र, आम्ही 365 दिवस पश्चिम बंगालमध्येच असतो, असे सांगत त्यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले.



























































