तुमचे अधिकार हिसकावणार्‍यांना माझ्या मृतदेहावरून जावे लागेल – ममता बॅनर्जी  

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा, एनपीआर आणि एनआरसीवरून सरकारवर पुन्हा एकदा टीका केली आहे. तुमचे अधिकार कुणी हिसकावण्यासाठी आले तर त्यांना आधी माझ्या मृतदेहावरून जावे लागेल, असा इशारा देतानाच या कायद्यावरून कुणी तुमच्याकडे कुठल्याही प्रकारची माहिती मागितली तर त्याला अजिबात माहिती देऊ नका, असे आवाहन ममता बॅनर्जी यांनी जनतेला केले आहे.

दक्षिण 24 परगणा येथील एका सभेत त्या बोलत होत्या. जर कुणी तुमच्याकडे कुठल्याही प्रकारची माहिती मागितली तर मी तुमच्यासाठी सुरक्षा रक्षक आहे. तुमचे अधिकार हिसाकावण्यासाठी कुणी आले तर त्याला माझ्या मृतदेहावरून जावे लागेल असे त्या म्हणाल्या. आम्ही कुणाच्या मेहेरबानीवर जगत नसून सीएए, एनपीआर आणि एनआरसी पश्चिम बंगालमध्ये लागू करू देणार नाही, असेही ममता बॅनर्जी यांनी सांगितले. ममता यांनी सुरुवातीपासूनच नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीच्या विरोधात आहेत. राज्यात एनपीआरही अपडेट करू देणार नाही, असेही त्या म्हणाल्या. जोपर्यंत सरकार नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसी मागे घेत नाही तोपर्यंत विरोध करतच राहणार असेही त्या म्हणाल्या.