वेस्ट इंडीजचे दिग्गज खेळाडू एव्हर्टन वीक्स यांचे निधन, 95व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

636

वेस्ट इंडीजचे महान क्रिकेटपटू एव्हर्टन वीक्स यांचे बुधवारी रात्री निधन झाले. ते 95 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने वेस्ट इंडीजच नव्हे तर जागतिक क्रिकेटवर शोककळा पसरली. एव्हर्टन वीक्स यांच्यासह फ्रँक वॉरेल व क्लाइड वॉलकॉट यांना वेस्ट इंडीजचे तीन ‘डब्ल्यू’ म्हणून ओळखले जायचे. आता एव्हर्टन वीक्स यांच्या निधनानंतर हे तिन्ही महान खेळाडू काळाच्या पडद्याआड गेले आहेत.

बार्बाडोसमध्ये तिघांचा जन्म… तोही 17 महिन्यांच्या आत…
एव्हर्टन वीक्स, फ्रँक वॉरेल व क्लाइड वॉलकॉट या तिन्ही खेळाडूंचा जन्म बार्बाडोस या शहरात झाला. तोही 17 महिन्यांच्या कालावधीत. फ्रँक वॉरेल यांचा जन्म 1 ऑगस्ट 1924मध्ये, तर एव्हर्टन वीक्स यांचा जन्म 26 फेब्रुवारी 1925मध्ये आणि क्लाइड वॉलकॉट यांचा जन्म 17 जानेवारी 1926मध्ये झाला. फ्रँक वॉरेल यांचा मृत्यू 13 मार्च 1967 साली झाला. त्यानंतर 26 ऑगस्ट 2006 साली वाइड वॉलकॉट यांचे निधन झाले. आणि आता एव्हर्टन वीक्स यांनी अखेरचा श्वास घेतला.

झोपडीत जन्म अन् मोठी झेप
एव्हर्टन वीक्स यांचा जन्म छोटय़ाशा झोपडीत गरीब कुटुंबात झाला. इंग्लंडमधील फुटबॉल संघ एव्हर्टन या नावावरून त्यांचे नाव ठेवण्यात आले. वडील त्रिनिदाद येथे कामाच्या निमित्ताने गेल्यानंतर आई व आजी यांनी एव्हर्टन व बहिणाला सांभाळले. एव्हर्टन यांना लहानपणापासूनच फुटबॉलसह क्रिकेटमध्येही रस होता. मात्र त्यांनी पुढे जाऊन क्रिकेटमध्येच करिअर केले.

एव्हर्टन वीक्स यांची कारकीर्द
एव्हर्टन वीक्स यांनी 1948 साली इंग्लंडविरूद्ध कसोटी कारकीर्दीला सुरूवात केली. तसेच 1958 साली त्यांनी पाकिस्तानविरूद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला. या दरम्यान त्यांनी 48 कसोटी सामन्यांमध्ये 58.61च्या सरासरीने 4455 धावांचा पाऊस पाडला. यामध्ये 15 खणखणीत शतके व 19 दमदार अर्धशतकांचा समावेश होता. 207 धावा ही त्यांची कसोटीतील सर्वोत्तम खेळी ठरली.

आपली प्रतिक्रिया द्या