
सामना प्रतिनिधी । मुंबई
पश्चिम रेल्वेवरील अंधेरीतील गोखले पुलाच्या दुर्घटनेनंतर ४४५ पुलांचे सेफ्टी ऑडिट करण्यास पालिका, रेल्वे अधिकारी आणि आयआयटीच्या तज्ञांच्या मदतीने शुक्रवारपासून सुरुवात झाली. वांद्रे आणि माहीम रेल्वे स्थानकांदरम्यान असलेल्या उड्डाणपुलाशेजारील पादचाऱ्यांसाठीचा मार्ग कालपासूनच बंद करण्यात आला आहे, तर वसईचा उड्डाणपूलदेखील बंद करण्याचे आदेश पश्चिम रेल्वेने दिले आहेत.
पश्चिम रेल्वेच्या अंधेरी व विलेपार्ले स्थानकांदरम्यानच्या उड्डाणपुलाला लागून असलेला फुटओव्हर ब्रिज ३ जुलै रोजी कोसळल्याने एका महिलेसह पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर रेल्वे मार्गावरील ४४५ पुलांचे सेफ्टी ऑडिट करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी १२ पथकांची स्थापना करण्यात आली असून शुक्रवारपासून संयुक्त पाहणी करण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. अंधेरी पुलाच्या इन्स्पेक्शनसाठी आज पालिका आणि रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पालिका, रेल्वे आणि आयआयटी अधिकाऱयांच्या पाहणीनंतर प्रत्येकाचा अहवाल आल्यानंतरच अंधेरीचा उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरू करायचा की नाही याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
पूल बंद केल्याने वाहतूककोंडी वाढली
वांद्रे आणि माहीम दरम्यानचा उड्डाणपूल सार्वजनिक बांधकाम खात्याने १९८१ रोजी बांधला होता. हा उड्डाणपूल सात ट्रकवरून जात असून आठ लेनमधून त्यावर ट्रफिक चालते. या पुलावर पादचाऱ्यांना जाण्यासाठी असलेला मार्ग कालच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २०१५ मध्ये झालेल्या पाहणीत या पुलावर कँटीलिवर पद्धतीने ३.१० मीटरची पादचाऱयांसाठी असलेली जागा पालिकेने आणखीन १.५० मीटरने वाढविल्याचे निदर्शनास आले आहे. पादचाऱयांसाठीची जागा रेल्वेला न कळविता परस्पर वाढविल्याचे पश्चिम रेल्वेचे प्रभारी विभागीय व्यवस्थापक मुकुल जैन यांनी सांगितले. वसईच्या पूर्व ते पश्चिम जोडणाऱ्या अंबाडी उड्डाणपुलाचे डिझाईनही धोकादायक वाटल्याने वाहतुकीसाठी तो बंद करण्याचे आदेश रेल्वेने संबंधित यंत्रणांना दिले आहेत. दरम्यान, अशाप्रकारे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने आधीच मेट्रोच्या कामामुळे पश्चिम उपनगरात सुरू असलेली वाहतुकीची कोंडी आणखीन वाढण्याचा धोका असल्याचे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे.




























































