
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यातील आंबोली (हिरण्यकेशी) येथील 2.11 हेक्टर क्षेत्रामध्ये ‘शिस्टुरा हिरण्यकेशी’ (देवाचा मासा) ही दुर्मिळ प्रजाती आढळून येत असल्याने या क्षेत्रास आता जैविक विविधता वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. यासंबंधीची अधिसूचना आज महसूल व वन विभागाने प्रसिद्ध केली. तेजस ठाकरे व त्यांच्या टीमने या शिस्टुरा हिरण्यकेशी माशाच्या नव्या प्रजातीचा शोध लावला आहे.
वन्यजीव संशोधकांनी ‘अॅक्वा’ या आंतरराष्ट्रीय मासिकात या दुर्मिळ प्रजातीचा अभ्यास सादर केला आहे. या संशोधनामुळे सह्याद्री विशेषकरून आंबोली परिसरातील जैवविविधता आणि त्याचे महत्त्व वाढणार आहे जनसामान्यांमध्ये जैवविविधता संवर्धनाबाबत जनजागृती होणे, त्यातून देवाचा मासा या दुर्मिळ प्रजातीचे जतन आणि संवर्धन होण्यास आता मदत होणार असून अशा प्रकारे हेरिटेजचा दर्जा मिळणारे हे देशातील पहिले क्षेत्र ठरले आहे. शिस्टुरा हिरण्यकेशी माशाच्या नव्या प्रजातीचा शोध डॉ. प्रवीणराज जयसिन्हा, तेजस ठाकरे, शंकर बालसुब्रमण्यम यांनी केला. या क्षेत्राला जैविक विविधता वारसा स्थळ म्हणून घोषित व्हावे अशी ग्रामस्थांचीही मागणी होती.
शिस्टुरा हिरण्यकेशी (देवाचा मासा) या प्रजातीचे वैशिष्टय़ म्हणजे ही प्रजाती दुर्मिळ असून ती आंबोली (हिरण्यकेशी) या गावाच्या हिरण्यकेशी नदीच्या उगम स्थानाजवळ आढळून येते.
शिस्टुरा हिरण्यकेशी ही दुर्मिळ माशांची प्रजाती मासेमारीमुळे धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे या प्रजातीचे संरक्षण आणि संवर्धन होण्याच्या दृष्टीने आजचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
n या क्षेत्रात पुरातन असे हिरण्यकेशी (महादेव) मंदिर व पुंड आहे. पुंडातील व हिरण्यकेशी नदीच्या पात्रात शिस्टुरा हिरण्यकेशी प्रजातीच्या दुर्मिळ माशांचा अधिवास आहे या क्षेत्रात गवे, हरीण, बिबट, अस्वल, शेकरू, माकड, वानर, मुंगूस, साळिंदर, खवले मांजर, भेकर आदी वन्यजीव आढळून येतात. तसेच साग, आंबा, किंजळ, ऐन, जांभा, उंबर, जांभूळ, अंजन, फणस अशा वृक्ष प्रजाती, झाडे-झुडपे आणि वेलींचेही या भागात अस्तित्व आहे.





























































