
इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धात अमेरिकेने उडी घेतली आहे. रविवारी सकाळी अमेरिकेने इराणच्या तीन आण्विक तळांवर हवाई हल्ले केले. इराणमधील फोर्डो, नतांझ आणि इस्फाहान या आण्विक तळांना नष्ट करण्यासाठी अमेरिकेने ‘बी-2 स्टील्थ बॉम्बर’ विमाने पाठवली होती. या विमानांनी आपले काम अचूक पार पाडले आणि इराणच्या हवाई हद्दीतून सुरक्षित बाहेरही आले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच याबाबत माहिती दिली. मात्र इराणच्या आण्विक तळांवर हल्ला करण्यासाठी ‘बी-2 स्टील्थ बॉम्बर’ ही विमानेच का वापरण्यात आली? या विमानांचे वैशिष्ट्य काय आहे? ही विमाने किती घातक आहेत? हे जाणून घेऊया.
बी-2 स्पिरिट हे एक अमेरिकन स्टील्थ बॉम्बर विमान आहे. नॉर्थ्रॉप ग्रुम्मन या संरक्षण क्षेत्रातील अमेरिकन कंपनीने हे विमान विकसित केले आहे. ‘बी-2 बॉम्बर’ या नावाने ओळखले जाणारे हे जगातील सर्वात महागडे लढाऊ विमान आहे. हे विमान अत्याधुनिक स्टील्थ तंत्रज्ञानाने बनवण्यात आले असून लांब पल्ल्याचे उड्डाण आणि प्रचंड प्रमाणात हत्यारं घेऊन जाण्यास सक्षम आहे. 1980 च्या दशकामध्ये हे विमान डिझाईन करण्यात आले होते आणि 1997 ला सेवेत आले.
काय आहेत वैशिष्ट्य –
– बी-2 बॉम्बर विमानाची रचना आणि या विमानाच्या निर्मितीसाठी वापरण्यात आलेला विशेष धातू यामुळे हे विमान रडारला गुंगारा देण्यास सक्षम आहे. तसेच पंखांची रचना आणि रडार शोषक कोटिंग विमानाला अदृश्य बनवते.
– बी-2 बॉम्बर 18 टन हत्यारं घेऊन जाण्यास सक्षम आहे. यात अणुबॉम्ब, पारंपरिक बॉम्ब आणि अचूक-मार्गदर्शक युद्धसामग्री, क्षेपणास्र यांचा समावेश आहे.
– एकदा इंधन भरल्यानंतर हे विमान सलग 11 हजार किलोमीटर उडू शकते. हवेतच इंधन भरण्याची क्षमता असल्याने विमानाची उड्डाण क्षमता आणखी वाढते.
– हे जगातील सर्वात महागड्या लढाऊ विमानांपैकी एक आहे. याची किंमत 2 अब्ज डॉलर (जवळपास 16 हजार कोटी रुपये) असून हे विमान दोन पायलट चालवतात.
– बी-2 बॉम्बर विमान हे 15 टन वजनाचे दोन बंकर बस्टर बॉम्ब वाहून नेऊ शकतात. हे बॉम्ब फक्त अमेरिकेकडेच असून याद्वारेच इराणच्या आण्विक तळांवर हल्ला करण्यात आला.
बी-2 बॉम्बर विमानांचा वापर अमेरिकेने 1999 च्या कोसोवा युद्धात केला होता. तसेच अफगाणिस्तान (2001), इराक युद्ध (2003) आणि लिबियामध्ये (2011) या विमानांचा वापर करण्यात आला होता. त्यानंतर आता तब्बल 14 वर्षांनी अमेरिकने ही विमाने रणांगणात उतरवली आहेत. अमेरिकेकडे 20 बी-2 बॉम्बर विमानं आहेत. याची किंमत, देखभाल खर्च प्रचंड असल्याने प्रत्येक मोहिमेत ही विमाने वापरली जात नाहीत.
सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करू! इराणची अमेरिकेला धमकी, सरकारी वाहिनीवरून मोठी घोषणा