
हल्ली विकेंडला, पार्टीमध्ये ड्रिंक करणं हे कॉमन झालं आहे. त्यात कुणी व्हिस्कीचे चाहते असतात तर कुणी थंडीचा फायदा घेत रम पितात. बिअर, स्कॉच, व्होडका असे प्रत्येकाची वेगळी आवड असते. मात्र या वेगवेगळ्या दारुंमध्ये फरक तो काय असतो हे अद्याप अनेकांना माहित नाही.
Quora.com वर एका वाचकाने या दारुंमध्ये काय फरक असतो याबाबत विचारले. त्या प्रश्नाला रविंद्र धुरजड यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी सविस्तर रित्या अगदी थेट हातभट्टीच्या दारूपासून परदेशी स्कॉचपर्यंतच्या सर्व दारूच्या प्रकारांमधले फरक सांगितले आहेत.
एथिल अल्कोहॉल (मद्यार्क) हा ज्या पेयांचा एक घटक असतो त्यांना मद्ये, मद्यपेये, अल्कोहॉलयुक्त पेये, दारू किंवा मदिरा असे म्हणतात.
1. स्थूलमानाने मद्यांचे दोन वर्ग केले जातात सरळ मद्ये व ऊर्ध्वपातित (Distilled) मद्ये (स्पिरिटे).
2. पिष्टमय पदार्थांपासून अगर ज्यामध्ये साखर आहे अशा नैसर्गिक पदार्थांपासून किण्वन (fermentation) क्रियेने बनणारी मद्ये पहिल्या वर्गात पडतात म्हणजे सरळ मद्ये.
3. त्यांपैकी पिष्टमय पदार्थांपासून बनणार्या मद्याला ‘बिअर’ आणि शर्करायुक्त नैसर्गिक रसापासून तयार होणार्या मद्याला ‘वाइन’ ही संज्ञा लावतात. म्हणजे बियर आणि वाइन ही सरळ मद्ये आहेत.
4. द्राक्षाच्या रसापासून बनविलेल्या मद्याला नुसती ‘वाइन’ ही संज्ञा लावतात. इतर फळांच्या रसापासून केलेल्या मद्यांना त्या त्या फळांच्या नावाचा उल्लेख करून नावे दिली जातात,उदा., संत्री, कॅनडा सफरचंद, पीच इत्यादी.
5. बिअरचे ऊर्ध्वपातन ( distillation) केले म्हणजे व्हिस्कीचे विविध प्रकार मिळतात.
6. वाइनच्या ऊर्ध्वपातनाने ब्रॅंडीचे निरनिराळे प्रकार बनतात.
7. बिअर बनविण्यासाठी मुख्यतः सातू (बार्ली) हे धान्य वापरले जाते. भिजवून मोड आणलेल्या सातूला ‘माल्ट’ म्हणतात.
8. स्कॉच व्हिस्की- अनेक प्रकारची धान्ये व उघड्या जाळावर जास्त भाजलेले माल्ट यांपासून बनविलेली व कमीतकमी 3 वर्षे मुरविलेली व्हिस्की ‘स्कॉच व्हिस्की’ म्हणून ओळखली जाते. तिला एक प्रकारचा जळकट वास येतो.
9. व्होडका- हे मूळचे रशियन मद्य चौदाव्या शतकात प्रथम रशियात बनविण्यात आले. गहू, राय, मका, बटाटे, बीट इत्यादींपैकी कोणत्याही स्वस्त व मुबलक असणार्या पदार्थांचे किण्वन केल्याने मिळ-णार्या बिअरचे ऊर्ध्वपातन करून व लोणारी कोळशाच्या थरातून गाळल्यावर ऊर्ध्वपातित जलाने विरल (सौम्य) करून ती बनविली जाते.
10. जिन- बिअरचे ऊर्ध्वपातन करताना काही वनस्पती अथवा मसाल्याचे पदार्थ तीमध्ये मिश्र केले म्हणजे जिन् हे मद्य बनते. जूनिपरची फळे, अँजेलिकाची मुळे, बडीशेप, धने, कॅरावेचे बी, संत्रे, लिंबू इत्यादींच्या साली, ज्येष्ठमध, वेलदोडे, कॅसियाचे खोड, कडू बदाम यांपैकी एक अथवा अधिक पदार्थ त्यासाठी वापरतात.
11. ब्रँडी – निरनिराळ्या वाइनचे ऊर्ध्वपातन केले म्हणजे ब्रँडी वर्गाची मद्ये मिळतात. ती कमीत कमी 2 वर्षे लाकडी पिपांत ठेवून मुरविलेली असतात.
12. रम – उसाचा रस, मोलॅसिस (उसाच्या रसातील ज्या भागापासून साखरेचे स्फटिक साध्या प्रक्रियांनी मिळविता येत नाहीत असा भाग) किंवा गूळ यांच्या किण्वनाने बनलेल्या सरळ मद्याचे ऊर्ध्वपातन केले म्हणजे हा मद्य प्रकार मिळतो. त्यामध्ये 80% हून जास्त अल्कोहॉल असते.
13. टकीला व मेस्कल – ही मद्ये मेक्सिकोमध्ये काही जातींच्या घाय-पाताच्या रसाच्या किण्वनाने आणि ऊर्ध्वपातनाने बनविली जातात. त्यामध्ये 40-50% अल्कोहॉल असते.
14. मोहाची दारू : हिंदुस्थानात मद्यनिर्मितीसाठी वापरला जाणारा दुसरा महत्त्वाचा कच्चा माल म्हणजे मोहाची फुले होत. मध्य हिंदुस्थानात मोहाची झाडे मोठ्या प्रमाणावर आढळतात. ही झाडे उंच वाढतात. फेब्रुवारी ते एप्रिलपर्यंत फुलांचा हंगाम असतो. ही पिवळट तपकिरी फुले नंतर जमिनीवर गळून पडतात. त्यांच्यात साखरेचे प्रमाण 60-70% असते. फुलांना थोडा उग्र वास असतो व तो मद्यालाही येतो. मोहाच्या फुलांचे ऊर्ध्वपातन करून मद्य बनविण्याची कला हिंदुस्थानात फार जुन्या काळापासून प्रचलित होती.
15. फेणी : काजू आभासी फळांच्या (बोंडूंच्या) रसाच्या किण्वनाने मिळणार्या सरळ मद्याच्या ऊर्ध्वपातनाने मिळणारे मद्य फेणी म्हणून ओळखले जाते. या मद्याची निर्मिती व खप विशेषकरून गोव्यामध्ये आहे.
16. ताडी-माडी – ताडाची व माडाची झाडे ताडी-माडीसाठी राखली जातात. या झाडांना खाचा पाडून त्यांतून पाझरणारा रस रात्रभर झाडाला त्या त्या ठिकाणी मडकी बांधून साठविला जातो. हा आंबविला की, ताडी-माडी तयार होते. यामध्ये अल्कोहॉलाचे प्रमाण 10% पर्यंत जाऊ शकते
17. हातभट्टीची दारू : नशा लवकर चढेल अशी कडक पण स्वस्त दारू बनविणे हा उद्देश असल्यामुळे बाजारातील टाकाऊ पदार्थांपासून (उदा., काळा गूळ, नासू लागलेली फळे, किडलेले धान्य इत्यादींपासून) ही बनविली जाते आणि त्यामध्ये मिथिल अल्कोहॉल, क्लोरल हायड्रेट, पोटॅशियम ब्रोमाइड, धोतर्याचे बी, भांग, गांजा, चरस इ. विषारी पदार्थही मिसळले जातात. यात किण्वन क्रियेवर व ऊर्ध्वपातनावर नियंत्रण नसते आणि दारू गाळणारे लोक बहुधा गलिच्छ व रोगग्रस्तही असतात. ऊर्ध्वपातनाने मिळविलेल्या दारूत अल्कोहॉलाचे प्रमाण 5-25% असते. कित्येकदा किण्वनानंतर मिळालेले द्रवमिश्रण ऊर्ध्वपातन न करता केवळ गाळून विकले जाते. हात- भट्टीच्या दारूला प्रांतपरत्वे खोपडी, लठ्ठा इ. नावे आहेत