
>>महेंद्र पाटील
आज पहाटे पुन्हा एक स्वप्न मला खूप मागे घेऊन गेलं. इतकं मागे जेव्हा कुणीच नव्हतं आयुष्यात आठवांचे स्पंद जागवत ठेवणारं. कुणीच नव्हतं असं ज्याची ओढ मनाला लागावी, ज्याच्या एका नजरेने घायाळ होऊन त्या गोड जखमासुद्धा जपत राहाव्या आजन्म, अशा रात्री नव्हत्या तेव्हा की भान हरवून चालत जावं दूरवर अंधाराच्या सीमा शोधत. असं नव्हतं काहूर, अशी नव्हती हुरहूर मनात नव्या-जुन्या आठवांची, मनाची व्याकुळता, विचारांचा गोंधळ, आर्त वेडी चाहूल असं काहीच नव्हतं गं माझ्या आयुष्यात. अतिशय साधं, सरळ, सोपं आयुष्य होतं माझं. अगदी संथ नदीच्या प्रवाहासारखं. पण अचानक त्या पाण्यात तरंग उठावे तशी तू आलीस आणि त्या नदीला पावसाविनाही पूर यावा तशी ओसंडून वाहू लागली. मनातही तरंग उठू लागले. माझ्या मनाचा एकेक हळवा कोपरा हळूच जागा झाला.
कोवळय़ा भावनांची एक नवी पहाट माझ्या मनात उगवली आणि सुरू झाले ते दिवस सुखाचे. प्रत्येक गोष्ट डोळय़ांना खूप सुंदर दिसू लागली. प्रत्येक ऋतू हवाहवासा वाटू लागला. मग ग्रीष्मातल्या उष्ण लहरी असोत की श्रावणातल्या झिम्मड सरी, सारं काही मनाला सुखद वाटू लागलं, आयुष्यातला एकेक क्षण जगण्याची उमेद पराकोटीने वाढली. आपण आजवर जे जगलो ते आयुष्य हे आयुष्य नव्हतंच कधी, अशी मनाची धारणा झाली. उगवतीच्या कोवळय़ा किरणांमध्ये भवितव्यांच्या धुसर वाटा न्हाऊन निघाल्या आणि दिसू लागलं एक नवं क्षितीज. नव्या कोऱया स्वप्नांचं आणि तरळू लागली तीच स्वप्नं तुझ्या पापण्यांच्या काठावर. अलगदपणे सजू लागला वसंत तुझ्या ओठावर! तुझं करुणामय रूप, तुझे अबोल प्रश्न सारं काही नवीन, पण मनाला आनंद देणारं होतं. हळूहळू मी पुरता बुडालो होतो एका वेगळय़ाच जगात. तिथून कधी बाहेर यायचंच नाही, हरवून जायचं इथेच कुठेतरी तसा मी हळूहळू हरवत गेलो. ना जगाचं भान होतं ना स्वतःचं. डोळय़ांसमोर फक्त तू आणि तूच अहोरात्र… माझी पहाटसुद्धा तूच आणि माझी रात्रसुद्धा तूच.
माझं हसणंसुद्धा तूच आणि माझं असणंसुद्धा तूच, माझ्या कल्पनेत, माझ्या अस्तित्वात जिकडे तिकडे फक्त तू तू आणि तूच, एकमेव. पण हे आयुष्य त्या वसुंधरेसारखं स्वतःभोवती फिरत असतं. कधी कधी ज्या वळणावरून आपला प्रवास सुरू झाला त्याच वळणावर येऊन पुन्हा उभं राहावं लागतं. तसं माझ्याही बाबतीत झालं. तू आलीस, माझी झालीस, माझ्या मनाचा प्रत्येक कोपरा व्यापून गेलीस. माझ्या मनातल्या भावनांना, विचारांना एकमेव रंग देऊन गेलीस. माझ्यातला मी मलाच ओळखता येऊ नये इतकं तू का बदललंस मला? कारण तू अलगद निघून गेलीस हलक्या पावलांनी. मला या वाटेवर एकटं सोडून आणि पुन्हा एकदा माझा मलाच शोध घ्यावा लागला.
माझी बुद्धी मला नेहमी सांगायची इतकंही हरवून जाऊ नये की आपण आपलीच ओळख विसरावी. कारण जगात कुठल्याही गोष्टीचा होत नसेल इतका त्रास आपणच आपली ओळख स्वतः शोधू लागतो तेव्हा आपल्याला होतो. पण मन कुठे ऐकतं बुद्धीचं? म्हणून माझं मन आणि माझी बुद्धी यांचं नेहमीच भांडण होतं आलंय. तेव्हा माझं मन गगनभरारी घेत असतं तेव्हा बुद्धी शांतपणे त्याची गंमत पाहत असते. ती कधी विचलित होत नाही. कारण तिला मनाचा चंचलपणाच आवडत नाही. या लढाईत नेहमीच मन जिंकत आलंय. पण यावेळी मात्र बुद्धी जिंकली आणि तिच्या विजयामागे फक्त तुझा हात होता. कारण मी मनाने वागत होतो आणि तू बुद्धीने. तू बुद्धीचंच ऐकून पुढे निघून गेलीस. माझा जराही विचार न करता आणि मी मात्र अजूनही त्या वेडय़ा मनाला कुरवाळत बसलो. माझा चेहरा आरशात पाहून मला कविवर्य ग्रेस यांच्या काही ओळी आठवल्या…
सुन्न देखणा चेहरा माझा
बिगुल मुखातुन वाजे
पराभवांच्या पर्वामध्ये
जसे उजळती राजे
अशीच काही माझी अवस्था झाली आहे. आता या वाटेवर उभा राहून मी शोधतोय स्वतःलाच. शोधता शोधता का कुणास ठाऊक, उगाच माझ्या मनाला एक वेडी आशा स्पर्श करून जाते की तू येशील पुन्हा याच वळणावर मलाच शोधत. तोवर बघू या मीच मला सापडतो का कुठे!


























































