
सामना प्रतिनिधी । बीड
लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी भाजपा – राष्ट्रवादीने आप आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. दोन्ही पक्षांनी ताकद पणाला लावली. जिल्हाभरातील नेते बीडमधे दाखल झाले. कोणी राष्ट्रवादीच्या रॅलीमध्ये तर कोणी भाजपाच्या व्यासपीठावर विराजमान होते. या भाऊ गर्दीत एक चेहरा मात्र काल कोठेच दिसत नव्हता. गेल्या तीन दशकातील हा पहिला दिवस असेल, उमेदवारी अर्ज भरताना ते कोठेच नव्हते. त्यांची अनुपस्थितीची जाणीव बीडवासीयांना झाली असावी. तो चेहरा म्हणजे आमदार ‘जयदत्त क्षीरसागर’ होय.
सोमवारी बीडमधून लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून प्रीतम मुंडे आणि राष्ट्रवादीकडून बजरंग सोनवणे सहीत सतरा उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपा, राष्ट्रवादीने काल आपली ताकद पणाला लावली. राष्ट्रवादीने रॅली काढली तर भाजपाने रॅली काढून सभा घेतली. जिल्हाभरातील लहान मोठे नेते बीड मध्ये दाखल झाले होते. आपआपल्या सोयीने कोणी राष्ट्रवादीच्या रॅलीत होते तर कोणी भाजपाच्या व्यासपीठावर होते.
एक उणीव बीडवासीयांना जाणवत होती. नेहमी सर्वात पुढे असणारा एक चेहरा आज मात्र कोठेच दिसत नव्हता. ना राष्ट्रवादीच्या रॅलीत ना भाजपाच्या व्यासपीठावर, तो चेहरा म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर होय.
एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीचे बडे बडे नेते एका रात्रीत निर्णय घेऊन भाजपाच्या कळपात जात असतांनाच राष्ट्रवादीवर नाराज असणारे जयदत्त क्षीरसागर मात्र गेल्या वर्षभरापासून तळ्यात मळ्यात का आहेत? ते ठाम निर्णयापर्यंत का येत नाहीत? राष्ट्रवादीने त्यांना बेदखल तर केलेच आहे. आता त्यांची आठवणही राष्ट्रवादी काढत नाही, अशा परिस्थितीमध्ये जयदत्त क्षीरसागर अतिशय शांत बसले आहेत. आपली भूमिका अद्यपि त्यानी स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे त्यांचे समर्थकही बुचकळ्यात पडले आहेत. जयदत्त क्षीरसागरांचे समर्थकही कालच्या या भाऊ गर्दीत दिसले नाहीत. क्षीरसागरांना निर्णय घ्यायला अवघड जात आहे की ते राष्ट्रवादीची गोची करत आहेत, की जनतेत सहानुभूती निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करत आहेत? असे अनेक सवाल जनतेच्या मनात उपस्थित राहत आहेत.
राजकारणात खुर्ची रिकामी झाली की दुसरा कोणीतरी खुर्ची हिसकावून घेण्यासाठी लगेच तयार असतो हे सूत्र आहे. गेल्या तीन दशकांपासून जयदत्त क्षीरसागर राजकीय क्षेत्रात वाटचाल करत आहेत. बीड मतदार संघासह जिल्हाभरात त्यांची वेगळी छाप आहे. गावागावात समर्थक आहेत. असंख्य संस्था आहेत. मोठी यंत्रणा आहे. तरी ही ते असे राजकीय विजनवासात असल्यामुळे समर्थक अस्वस्थ आहेत. क्षीरसागर आता राष्ट्रवादीपासून खुप दूर गेले आहेत. पुन्हा राष्ट्रवादीकडे परत येतील, असा त्यांचा स्वभावही नाही. आपली प्रतिष्ठा, मान, सन्मान याकडे विशेष लक्ष देणारे जयदत्त क्षीरसागर यांची राजकीय भूमिका अजूनही गुलदस्त्यात असली तरी ते आपली यंत्रणा कोणाच्या मदतीला पाठवतात, हे दोन – चार दिवसांमध्ये स्पष्ट होईल.






























































