
विम्बल्डन या टेनिस विश्वातील मानाच्या स्पर्धेतील महिला गटात कोण चॅम्पियन होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ऑस्ट्रेलियाची 25 वर्षीय अॅश्ले बार्टी व झेक प्रजासत्ताकची 29 वर्षीय पॅरोलिना फ्लिस्कोवा यांच्यात जेतेपदाची लढत उद्या रंगणार आहे. दोन्ही महिला टेनिसपटूंनी पहिल्यांदाच विम्बल्डन टेनिस ग्रॅण्डस्लॅममधील महिला एकेरीची अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे दोन टेनिसपटूंमधील ही जेतेपदाची लढाई रोमहर्षक होईल, असे म्हटले तरी या वेळी वावगे ठरणार नाही.
एकदाही ग्रॅण्डस्लॅम जिंकलेले नाही
झेक प्रजासत्ताकची पॅरोलिना फ्लिस्कोवा हिने अद्याप एकदाही ग्रॅण्डस्लॅम जेतेपद पटकावलेले नाही. 2016 सालामधील अमेरिकन ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅममध्ये तिला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले होते. तसेच 2017 साली प्रेंच ओपन व 2019 साली ऑस्ट्रेलियन ओपन या ग्रॅण्डस्लॅममध्ये तिचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले होते. त्यामुळे 13व्या रँकिंगवर असलेल्या या टेनिसपटूने विम्बल्डन टेनिस ग्रॅण्डस्लॅमच्या जेतेपदाची आस बाळगली असेलच.
दुसऱया ग्रॅण्डस्लॅम अजिंक्य पदाचे वेध
ऑस्ट्रेलियाची अॅश्ले बार्टी सध्या रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर विराजमान आहे. त्यामुळे उद्याच्या लढतीत तिचे पारडे जड असेल यात वाद नाही. पण या खेळात कोणताही निकाल लागू शकतो. त्यामुळे अॅश्ले बार्टी पॅरोलिना फ्लिस्कोवाला कमी लेखणार नाही हे पक्के आहे. अॅश्ले बार्टीने 2019 साली प्रेंच ओपन ही स्पर्धा जिंकली होती. आता तिला टेनिस कारकिर्दीतील दुसरे ग्रॅण्डस्लॅम जिंकायचे असेल. यासाठीच उद्या होणाऱया लढतीत ती आपला सर्वेत्तम खेळ करीत पॅरोलिना फ्लिस्कोवा हिच्यासमोर कडवे आव्हान उभे करील.





























































