शाळेची बस पिवळ्याच रंगाची का असते? जाणून घेऊया त्यामागील वैज्ञानिक कारण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रस्त्यावर अनेक शाळेच्या बस आपण पाहिल्या असतील. या बस वेगवेगळ्या शाळेंच्या दिसत असल्या तरी रंग मात्र सारखाच असतो. या सगळ्या बसेस पिवळ्या रंगाच्या असतात. त्यामुळे शाळेची बस ही पिवळ्या रंगाचीच का असते असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतो. आपण जाणून घेऊया पिवळ्या रंगामागचे वैज्ञानिक कारण.

How Stuff Works’ या संकेतस्थळाच्या अहवालानुसार शाळेच्या बसना पिवळा रंग देण्याची सुरुवात अमेरीकेतून झाली आहे. कोलंबिया विद्यापिठाच्या टीचर्स कॉलेजमध्ये प्राध्यापक फ्रॅंक सियर यांनी 1930 च्या दशकात देशातील शाळा वाहतूकीशी संबंधित वाहनांचे संशोधन करायला सुरुवात केली. त्यांनी न्यूयॉर्क टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, तोपर्यंत शालेय वाहनांची, विशेषत: बसेसची रचना ठरवण्यात यावी, असे कोणतेही विशिष्ट मानक नव्हते. त्यांनी अमेरिकन शाळेतील मुलांच्या सुरक्षेसाठी एक विशेष बैठक बोलावली, ज्यामध्ये देशभरातील प्रमुख शिक्षक, वाहतूक अधिकारी, बस उत्पादक इत्यादींनी भाग घेतला. त्या सर्वांनी मिळून बसचा रंग कसा असावा ते ठरवले. त्यांनी कॉन्फरन्सरुममध्ये सर्व प्रकारचे रंग लावले आणि सर्वांना रंग निवडायला सांगितले. सर्वांनी मिळून पिवळा-नारंगी रंगाची निवड केली. यामध्ये पिवळ्या रंगाला जास्त पसंती होती आणि त्यामुळे पिवळ्या रंगाची निवड करण्यात आली. सर्वांनी पिवळ्या रंगाची यासाठी निवड केली कारण सर्वांच्या डोळ्यात तो पटकन रंग भरत होता. तेव्हापासून शाळेच्या बसचा रंग पिवळा ठेवला.

त्यानंत वैज्ञानिकांनी हा रंग योग्य असल्याचे सांगितले. कारण मानवी डोळ्यांना पिवळा रंग सहज दिसतो. हा व्हिजीबिलीटी स्पेक्ट्रमच्या शीर्षस्थानी आहे. याचे कारण मानवी डोळ्यांमध्ये फोटोरिसेप्टर पेशी असतात ज्यांना शंकू म्हणतात. डोळ्यांमध्ये तीन प्रकारचे शंकू असतात जे लाल, हिरवे आणि निळे रंग शोधण्यासाठी बनवले जातात. पिवळा प्रकाश एकाच वेळी लाल आणि हिरव्या दोन्ही पेशींवर परिणाम करतो, ज्यामुळे तो डोळ्यांना अधिक दिसतो.