
केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान (kerala governor arif mohammad khan) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. राज्यपाल विरुद्ध केरळ सरकार असा वाद पाहायला मिळत आहे. राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आरएसएसच्या हातचे बाहुले असल्याचा आरोपही मुख्यमंत्री पिनरयी विजयन यांनी केला होता. यानंतर आता राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आपल्या विधानामुळे पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहेत.
शनिवारी तिरुवनंतपुरम येथे आयोजित ‘हिंदू कॉन्क्लेव’मध्ये राज्यपाल आरिफ मोहम्मद खान सहभागी झाले. यावेळी केलेल्या स्वागतामुळे ते भारावून गेले. तसेच उपस्थितांकडे त्यांनी एक तक्रारही केली. मला तुम्ही हिंदू का म्हणत नाही? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद म्हणाले की, हिंदू ही धार्मिक संज्ञा आहे असे मला वाटत नाही, तर ती भौगोलिक संज्ञा आहे. जो कोणी हिंदुस्थानात जन्माला आला आहे, जो कोणी हिंदुस्थानात पिकलेले अन्न खातो, जो कोणी हिंदुस्थानातील नद्यांचे पाणी पितो, त्याला स्वतःला हिंदू म्हणवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे तुम्ही मला हिंदू म्हणा, असेही ते यावेळी म्हणाले.
बीबीसी डॉक्टुमेंटरीवरही केली टिप्पणी
सध्या देशभरात बीबीसीची मोदींवरील डॉक्युमेंटरी वादाचा विषय ठरला आहे. अनेक ठिकाणी यावरून राडाही सुरू आहे. यावर आता केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद यांनीही टिप्पणी केली आहे. ब्रिटीश राजवटीत एकही डॉक्युमेंटरी का बनवली गेली नाही? कलाकारांचे हात कापले गेले तेव्हा तुम्ही डॉक्युमेंट्री का बनवली नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हिंदुस्थानचे तुकडे होऊन ते आपापसात भिडतील असे भाकित काहींनी केले होते, मात्र हिंदुस्थानचा विकास पाहून ते निराश झाले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.