
आपल्या अवैध दारू व्यवसायाची माहिती पोलिस व नागरिकांना दिल्याच्या संशयावरून एका विवाहितेच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला आहे. नगर जिल्ह्यात ही घटना घडली असून या प्रकरणी महिलेचा पती आणि सासरा यांना अटक करण्यात आली आहे.
प्रिया राजेंद्र मधे (वय 30) असं या महिलेचं नाव असून तिचा पती राजू मधे याने धारदार शस्त्राने भोसकून ठार करण्याचा प्रयत्न केला. ही घटना ठाकरवाडी (म्हाळादेवी) येथे 24 एप्रिल रोजी घडली. यात गंभीर जखमी झाल्याने महिलेवर नगरच्या आनंदऋषी हॉस्पिटलमध्ये औषधोपचार सुरू आहेत. प्रिया हिने तिच्या नवर्यानेच वार केल्याने मी जखमी झाल्याचा जबाब नोंदवला आहे. प्रिया हिच्या जबाबावरून अकोले पोलिसांनी जखमी प्रिया मधे हिचा पती आरोपी राजेंद्र मधे व शिवराम मधे यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
म्हाळादेवी परिसरात राजू मधे याचे आदिवासी कुटुंब वास्तव्यास आहे. वडील व तो गावात गावठी हातभट्टी चालवत असल्याची माहिती गावातील काही तरुणांनी पोलिसांना दिली होती. कोरोनाच्या बंदोबस्तात पोलीस असल्यामुळे अवैध दारू विक्री चौकशीसाठी उशीर झाला. पाच दिवसानंतर चौकशी करता अकोले पोलीस म्हाळादेवीत दाखल झाले. गावकर्यांनी अवैध दारू विक्रीची माहिती पोलिसांना दिली. काही महिलांनी यावर आवाज उठवला. त्यात प्रिया मधे असल्याचे तिचा पती राजू यास समजले. त्यामुळे त्यांच्यातील वाद विकोपाला गेला. पती राजुने पत्नीला धारधार हत्याराने भोसकून ठार मारण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात 28 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.





























































