
सामना ऑनलाईन, नागपूर
‘निवडणूक आयोग हा तटस्थ राहिलेला नाही , तो मोदी सरकारचा हस्तक झालेला आहे आमची सत्ता येऊ द्या, निवडणूक आयोगाला 2 दिवस तुरुंगात टाकू’ असे धक्कादायक विधान प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. यवतमाळमध्ये बहुजन वंचित आघाडीची सभा झाली. या सभेमध्ये बोलताना आंबेडकर यांनी हे विधान केले आहे. सध्याचे भाजपा सरकार बिनडोकांचे सरकार असून त्याचे नेतृत्व करणारे नरेंद्र मोदी आणि अमित शहा दोघेही महाडाकू आहे अशी टीकाही आंबेडकर यांनी केली आहे.
बुधवारी दिग्रस येथील लक्ष्मणराव बनगीनवार मैदानावर बहुजन वंचित आघाडीची सभा आयोजित करण्यात आली होती. या मैदानातील प्रचार सभेच्या मंच वरून त्यांनी निवडणूक आयोगालाच जेलमध्ये घालू असे खळबळजनक वक्तव्य केले आहे. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात CRPF चे 40 जवान शहीद झाले होते. हा हल्ला हे मॅच फिक्सिंग होतं असा आरोप आंबेडकर यांनी केला आहे. या हल्ल्यासंदर्भात बोलण्यास निवडणूक आयोग रोखते असा दावा आंबेडकरांनी केला आहे. ही यंत्रणा ही भाजपाच्या हातचे बाहुले बनले असून आम्हाला सत्तेत येऊ द्या निवडणूक आयोगाला जेलमध्ये घालू असं आंबेडकर म्हणाले आहेत.
बहुजन वंचित आघाडीने यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघातही आपला उमेदवार उभा केला आहे. या उमेदवाराच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर यवतमाळमध्ये आले होते. यावेळी असदुद्दीन ओवेसी मात्र सभेला हजर नव्हते. प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्या 25 मिनिटांच्या भाषणात भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षावर सडकून टीका केली.


























































