गोदावरी कालव्यांचाही प्रश्न सोडवणार, खासदार सदाशिव लोखंडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कोपरगाव 

आमदार झाल्यावर कुकडी प्रकल्पाचा प्रश्न सोडविला, खासदार झाल्यावर 48 वर्ष प्रलंबित निळवंडे कालव्यांचा प्रश्न सोडविला. आता गोदावरी कालव्यांचा 40 वर्षांपासुन रखडलेला प्रश्न सोडविण्याचा माझा निर्धार असून, लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना साथ देण्यासाठी मी लढणार असे खासदार सदाशिव लोखंडे यांनी एका बैठकीत सांगितले. यावेळी आमदार स्नेहलता कोल्हे, जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, उपजिल्हा प्रमुख प्रमोद लबडे व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

साईबाबांच्या नगरीचा खासदार म्हणुन राज्य व केंद्र शासनाच्या सर्व यंत्रणेत माझे संबंध असून घाटमाथ्याचे पश्चिमेकडे वाहून  जाणारे  60 टी. एम. सी. पाणी पुर्वेकडे वळवून नगर नाशिक व मराठवाडयाबरोबरच गोदावरी कालव्यांचे हक्काचे 11 टीएमसी पाणी शेवटच्या शेतकर्‍यांना पाणी मिळवून देतांना कोपरगावचे गेलेले वैभव प्राप्त करून घेण्यासाठी यशस्वी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार स्नेहलता कोल्हे यांनी देशाला पंतप्रधान मोदी यांची गरज असून देशाच्या हितासाठी पंतप्रधानांना मत म्हणजेच लोखंडे यांना मत यासाठी कार्यकर्त्यांनी झटून कामाला लागावे असे आवाहन केले. उज्वला गॅस, घरकुले, शौचालय निधी देतांना पुर्वीचा भ्रष्टाचार बंद करून लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे येतात. दळणवळणाबरोबरच विकासाच्या सर्वच क्षेत्रात मागील पाच वर्षात काम झाले असुन 60 वर्षांची व 60 महीन्यांची तुलना केल्यास 100 पटीने मोदीजींने चांगले काम केले आहे. आमची युती घट्ट असुन खा. लोखंडेचा पुन्हा विजय होईल, असे त्या म्हणाल्या.