
सामना प्रतिनिधी । मुंबई
लोकसभा निवडणुकीत महायुतीने विरोधकांना धोबीपछाड देत राज्यभरात 41 जागा निवडून आणल्या. बहुसंख्य जागा या लाखोंच्या फरकाने निवडून आल्याने विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. एक लोकसभा म्हणजे सहा विधानसभा मतदारसंघ. त्यामुळे कोणत्या मतदारसंघामध्ये किती मते पडली, कोणत्या मतदारसंघावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे याची जुळवाजुळव सुरू झाली आहे. लोकसभेच्या उत्साहानेच विधानसभेवर भगवा फडकवणार असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये आहे.
लोकसभा निवडणुकीतील बहुतांशी जागांवर शिवसेना-भाजप महायुतीला विजय मिळाला आहे. विधानसभेत शिवसेनेचे 63 तर भाजपचे 122 आमदार असे बलाबल आहे. लोकसभा निवडणुकीतही शिवसेनेने 18 जागांवर विजय मिळविला आहे. यापैकी कोल्हापूर, हातकणंगले या नवीन जागांवर शिवसेनेला विजय संपादन करता आला आहे. त्याचप्रमाणे भाजपकडे माढा, नांदेड या नवीन जागा आल्या आहेत. त्यामुळे आधीच्या मतदारसंघांबरोबरच या मतदारसंघांमध्ये शिवसेना-भाजपची ताकद वाढली आहे. शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे, अनंत गीते, आनंदराव अडसूळ यांचा पराभव अत्यंत कमी फरकाने झाला आहे. मात्र या मतदारसंघांमध्ये त्यांची ताकद आजही कायम आहे. त्यामुळे नेमका कोणत्या मतदारसंघांमध्ये मतांची टक्केवारी घसरली याचा अभ्यास करून विधानसभेची रणनीती आखली जात आहे. मुंबईत शिवसेनेच्या उमेदवारांना मिळालेले लाखालाखाचे मताधिक्य पाहता या ठिकाणीही विधानसभेच्या जागांवर महायुतीचे मताधिक्य वाढले आहे. त्यामुळे ज्या ज्या मतदारसंघांत मताधिक्य वाढले आहे त्या मताधिक्याचा लाभ आणि ज्या मतदारसंघांत काम करण्याची आवश्यकता आहे अशा मतदारसंघांतला जनसंपर्क दांडगा करण्यासाठी कार्यकर्ते आतापासूनच कामाला लागले आहेत.
इथे मिळणार निर्विवाद यश
जळगावमध्ये भाजपच्या उन्मेष पाटील यांचा 4 लाख 11 हजारांच्या मताधिक्याने विजय झाला आहे. रावेरमध्ये रक्षा खडसे यांना मिळालेली 3 लाख 35 हजारांची आघाडी तर शिवसेनेच्या हेमंत पाटील यांना हिंगोलीतून दोन लाख 77 हजार मतांची आघाडी मिळाली आहे. जालन्यामधून रावसाहेब दानवे हे 3 लाख 32 हजार मताधिक्याने विजयी झाले आहे. शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांनी नाशिक मतदारसंघातून 2 लाख 92 हजार मतांची तर डॉ. श्रीकांत शिंदे यांनी 3 लाख 44 हजार मतांची आघाडी घेतली आहे. ठाण्यामध्ये राजन विचारे यांनी तब्बल 4 लाख 12 हजार इतके दणदणीत मताधिक्य घेतले. गोपाळ शेट्टी हे तब्बल 4 लाख 65 हजार इतक्या मताधिक्याने निवडून आले आहेत तर शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांनी 2 लाख 60 हजार इतके मताधिक्य घेतले. गिरीश बापट यांनी 3 लाख 24 हजार इतके मताधिक्य घेतले तर नगरमध्ये भाजपकडून लढणाऱया डॉ. सुजय विखे यांनी 2 लाख 81 हजारांचे मताधिक्य मिळवले. लातूरमध्ये भाजपचे सुधाकर शृंगारे यांनी 2 लाख 89 हजारांचे मताधिक्य घेतले असून कोल्हापूरमध्ये शिवसेनेच्या संजय मंडलिक यांनी 2 लाख 70 हजारांचे मताधिक्य घेतले. 14 मतदारसंघांत मिळालेली अडीच लाख ते तीन लाखांवर मिळालेली आघाडी यामुळे राज्यातील 84 विधानसभांवरील विजय निश्चित झाल्याचे मानले जात आहे.
विजयी मिरवणुकांची तयारी
विजयानंतर मोठय़ा प्रमाणावर गुलाल उधळून आनंद साजरा केला असला तरी कार्यकर्त्यांना प्रतीक्षा आहे ती विजयी मिरवणुकांची. निवडणुकांची आचारसंहिता 28 मेपर्यंत चालणार आहे. निवडणुकांचा हा उत्साह साजरा करण्यासाठी कार्यकर्ते उत्सुक आहेत. त्यामुळे पुढील आठवडा हा विजयी मिरवणुकांचा आठवडा ठरणार आहे. शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांचे विजयी मेळावे 29 तसेच 31 मे रोजी होणार आहेत तर राहुल शेवाळे, अरविंद सावंत यांच्याही विजयी मिरवणुकांची जय्यत तयारी सुरू आहे. या विजयी मिरवणुकांच्या माध्यमातून मतदारांचे आभार मानून कार्यकर्त्यांच्या एकजुटीची वज्रमूठ करून पुन्हा विधानसभेत काँग्रेस-राष्ट्रवादीला धूळ चारण्याचा निश्चय केला जाणार आहे.




























































