
सातारा, वाई, महाबळेश्वर, पाटण, जावली, कराड, कोरेगाव, माण, खटाव तालुक्यातील 140 ग्रामपंचायतींच्या हद्दीत सुमारे 1 हजार 927 पवनचक्क्या आहेत. अनेक कंपन्यांकडे सुमारे 77 लाख 68 हजार रुपयांची थकबाकी असून ज्या पवनचक्क्या कंपन्यांनी कराची थकबाकी दिली नाही. अशा कंपन्यांना ग्रामपंचायतींमार्फत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. कराची रक्कम न भरल्यास पवनचक्क्या सील करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यात सातारा, वाई, महाबळेश्वर, पाटण, जावली, कराड, कोरेगाव, माण व खटाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पवनचक्क्या उभ्या राहिल्या आहेत. प्रदूषण विरहित, कमी उत्पादन व व्यवस्थापन खर्चामुळे पवन ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून वीज निर्मितीचा चांगला पर्याय पुढे आला आहे. त्यातून पवन ऊर्जा प्रकल्प निर्मितीच्या संकल्पनेची सुरुवात चाळकेवाडी व ठोसेघर या पठारावर झाली.
सुमारे 1996 मध्ये पहिली पवनचक्की उभारण्यात आली. सध्या सातारा जिल्ह्यातील बहुतांश पठारावर पवनचक्क्यांचे जाळे निर्माण झाले आहे. दुष्काळी भागातील डोंगरावरही पवनचक्क्यांची पाती फिरताना दिसत आहेत.
सातारा तालुक्यातील 10 ग्रामपंचायतींच्या हद्दीत 179 पवनचक्क्या असून त्यांच्याकडे 21 लाख 20 हजार रुपयांची थकबाकी आहे. कोरेगाव तालुक्यातील 30 ग्रामपंचायतींच्या हद्दीत 81 पवनचक्क्या असून त्यांच्याकडे 13 लाख 7 हजार रुपयांची थकबाकी आहे. खटावमधील 25 ग्राम पंचायतींच्या हद्दीत 369 पवनचक्क्या असून त्यांच्याकडे 44 लाख 2 हजार रुपयांची थकबाकी आहे. माण तालुक्यातील 10 ग्रामपंचायतीच्या हद्दीत 190 पवनचक्क्या असून त्यांच्याकडे 45 लाख 61 हजार रुपयांची थकबाकी आहे. वाई तालुक्यातील 5 ग्रामपंचायतींच्या हद्दीत 25 पवनचक्क्या असून त्यांच्याकडे 2 लाख 24 हजार रुपयांची थकबाकी आहे.
जावली तालुक्यातील 3 ग्रामपंचायतींच्या हद्दीत 14 पवनचक्क्या असून त्यांच्याकडे 2 लाख 74 हजार रुपयांची थकबाकी आहे. महाबळेश्वर तालुक्यातील एका ग्रामपंचायतीच्या हद्दीत 6 पवनचक्क्या असून त्यांच्याकडे 1 लाख 32 हजार रुपयांची थकबाकी आहे. कराड तालुक्यातील 2 ग्रामपंचायतीच्या हद्दीत 8 पवनचक्क्या असून त्यांच्याकडे 2 लाख 23 हजार रुपयांची थकबाकी आहे. पाटण तालुक्यातील 54 ग्रामपंचायतीच्या हद्दीत 1 हजार 55 पवनचक्क्या असून त्यांच्याकडे 1 कोटी 62 लाख 79 हजार रुपयांची थकबाकी आहे.


























































