थंडीतला गारवा….

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मीना आंबेरकर

नाताळ, नव्या वर्षाची पूर्वसंध्या सगळेच आनंद एकत्र आहेत… गारेगार गोडव्याने नव्या वर्षाचे स्वागत करूया…
सध्या नाताळमुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. ठिकठिकाणी नाताळच्या निमित्ताने ‘ख्रिसमस डेकोरेशन्स’ केलेली आहेत. निसर्गही या उत्साहात सहभागी आहे. विविध भाज्या, फळे, फुले यांची रेलचेल आहे. हवामानही अनुकूल आहे. गोठवणारी थंडी नसली तरी हवेतील सुखद गारठा मन प्रसन्न ठेवतोय. ठिकठिकाणी नाताळनिमित्त पाटर्य़ांचे आयोजन आहे. अशावेळी आईस्क्रीमचा आस्वाद घेण्यातही एक वेगळाच आनंद आहे. थंड हवेत आईस्क्रीम खाणे यातही थ्रील आहे. तर बघूया काही आईस्क्रीमच्या रेसिपीज…

बेसिक आईस्क्रीम
साहित्य…1 लीटर म्हशीचे होल मिल्क. पाव कप कॉर्नफ्लॉवर, 1 कप साखर, पाव चमचा जीएसएम पावडर (स्टोअरमध्ये उपलब्ध असते), पाव चमचा सीएमसी पावडर.
कृती…कॉर्नफ्लॉवर, जीएसएम पावडर व सीएमसी पावडर एकत्र करून त्यात थोडे गरम दूध टाकून त्याची पेस्ट करा. फेसून चांगले एकत्र झाल्यावर दूध, साखर व ती पेस्ट एकत्र करून गॅसवर ठेवा. सतत ठवळत राहा. उकळी आल्यावर गॅस बारीक करून 5 ते 7 मिनिटे ढवळून गॅस बंद करा. मिश्रण थंड होईपर्यंत हलवत राहा. थंड झाल्यावर बंद डब्यात सेट करण्याकरिता फ्रिझरमध्ये ठेवा. साधारण 8 ते 10 तासांत मिश्रण सेट होते. दूध कच्चेच घ्या. सतत हलवत राहा.

बदाम पिस्ता आईस्क्रीम
साहित्य…3 चमचे बदाम, 3 चमचे पिस्ते, 4 चमचे साखर, 1 कप दूध, 1 कप तयार कस्टर्ड, अर्धा चमचा बदाम इसेन्स, 1 कप क्रीम.
कृती…बदाम व पिस्ते साल काढून बारीक तुकडे करावेत. दूध गरम करावे. दुधात साखर घालावी. बदाम पिस्त्याच्या कापांवर गरम दूध घालावे. गार झाल्यावर कस्टर्ड व क्रीम घालावे. बदाम इसेन्स घालावा. आईस्क्रीम मेकरमध्ये दूध व कस्टर्डचे मिश्रण घालून फ्रीजमध्ये तयार करण्यासाठी ठेवावे. आईस्क्रीम मेकर नसल्यास मिश्रण ट्रेमध्ये घालून तो ट्रे फ्रिजरमध्ये ठेवा. एक तासात घट्ट झाल्यावर बाहेर काढून बाऊलमध्ये काढून चमच्याने किंवा रवीने घुसळून फेटून घ्यावे व परत ट्रेमध्ये घालून गार
करण्यास ठेवावे. त्यामुळे आईस्क्रीम बर्फासारखे घट्ट न होता रवाळ होते.

custord-2

आईस्क्रीमसाठी कस्टर्ड्स

साहित्य…2 चमचे कस्टर्ड पावडर, अर्धा लिटर दूध, 4 चमचे साखर.

कृती….अर्धा कप गार दुधात 2 चमचे कस्टर्ड पावडर मिसळावी. उरलेले दूध उकळायला ठेवावे. त्यात साखर गालावी. दुधाला उकळी आली की कस्टर्ड पावडर घातलेले दूध घालावे. ते सतत ढवळावे. गुठळी होऊ देऊ नये. उकळी आल्यावर खाली उतरवावे व झाकण ठेवून गार होऊ द्यावे. हे कस्टर्ड आईस्क्रीमसाठी उपयोगात आणावे.

butter

बटर स्कॉच आईस्क्रीम
साहित्य…अर्धा लिटर आटवलेले दूध, मिल्क पावडर 1 वाटी, कॉर्नफ्लॉवर 2 सपाट चमचे, साखर पाऊण वाटी, स्टॅबिलायझर पावडर दोन चिमूट, अर्धा चमचा मध, 1 चमचा अमूल बटर, काजू अक्रोडचे पाकवलेले तुकडे, चॉकलेट इक्लेअर किंवा काजू चिक्की.

कृती…पाव वाटी थंड दुधात मिल्क पावडर व कॉर्नफ्लॉवरची पेस्ट तयार करा. ही पावडर नेहमी थंड दुधात मिसळावी. उरलेले दूध उकळायला ठेवा. दुधाला उकळी आली की त्यात कॉर्नफ्लॉवर व मिल्क पावडरची पेस्ट हळूहळू ओता. दूध हलवत राहा. दुधाला पुन्हा उकळी आली की गॅस बंद करा. दूध घट्ट झाल्यावर त्यात साखर, स्टॅबिलायझर मिक्स केलेले दूध व कलर इसेन्स टाकून मिक्सरवर फेस येईपर्यंत फेटा. हिंडालियमच्या पसरट ट्रेमध्ये मिश्रण ओतून ट्रे फ्रीजरमध्ये ठेवा. आईस्क्रीम अर्धे मेट झाल्यानंतर बाहेर काढून चमच्याने फेटून एकजीव करा व पुन्हा फ्रीजरमध्ये ठेवा. असे केल्याने आईस्क्रीम सॉफ्ट होते.

वरील प्रकारे तयार केलेल्या आईस्क्रीमच्या मिश्रणात अर्धा चमचा मध व 1 चमचा अमूल बटर टाकावे. मिश्रण गार करून आईस्क्रीम अर्धवट सेट झाल्यावर त्यात काजू व अक्रोडचे तुकडे पाकवून टाकावेत किंवा चॉकलेट एक्लेअरचे तुकडे टाकावेत. अथवा काजू चिक्कीचे तुकडे टाकावेत.