मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, हिवाळी अधिवेशनाचा कालावधी पुढच्या वर्षी वाढवू

राज्य विधिमंडळाचे यंदाचे हिवाळी अधिवेशन दहा दिवसांऐवजी सात दिवसांचे होत आहे. निवडणूक आचारसंहितेमुळे या वेळी अधिवेशन कमी कालावधीचे असले तरी पुढच्या वर्षी आपण त्याची भरपाई करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विरोधी पक्षाच्या सदस्यांना दिले.

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन साधारणतः दोन आठवडे म्हणजे दहा दिवस चालते, मात्र यंदा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमुळे अधिवेशन आठवडाभर म्हणजे 14 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. अधिवेशनाच्या कमी कालावधीचा मुद्दा काँग्रेसच्या नाना पटोले यांनी विधानसभेत उपस्थित केला.

विदर्भात अधिवेशन होत आहे, त्यामुळे कालावधी वाढवा. अधिवेशन दोन आठवडे घ्या. सरकारला केवळ पुरवणी मागण्या मंजूर करायच्या असतील तर मग एक दिवसाचे अधिवेशन बोलवा, असे पटोले म्हणाले. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी, मी मुख्यमंत्री असताना नागपूरमध्ये सर्वात जास्त दिवस अधिवेशन चालवले आहे आणि पुढेही चालणार आहे. निवडणूक आयोगाचे काही निर्देश आहेत, त्यामुळे अधिवेशन दहा दिवसांऐवजी सात दिवसांचे घेत आहोत, असे सांगितले.