
हिंदुस्थानी आयटी क्षेत्रातील अग्रग्णय कंपनी विप्रोच्या नवे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ थिएरी डेलपोर्टे यांना 5.9 ते 7.2 मिलियन युरो इतका तगडा पगार देऊ केला आहे. ज्याची हिंदुस्थानी चलनानुसार किंमत साधारण 50 ते 62 कोटींच्या घरात आहे. देशभरातील आयटी क्षेत्रातील हा सर्वाधिक पगार मानला जात आहे. या भरगच्च पगाराबरोबरच कंपनीचे शेअर आणि इतर लाभदेखील त्यांना देण्यात येणार आहे. विप्रोने आपल्या आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी शेअर धारकांना दिलेल्या नोटीसमध्ये ही बाब समोर आली आहे.
विप्रोची 74 वी वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या 13 जुलै रोजी पार पडणार आहे. व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून होणाऱया या सभेत थिएरी डेलपार्टे यांची नियुक्ती करण्यासाठी मंजूर घेण्यात येणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. डेलपार्टे हे लवकरच विप्रोचा कार्यभार स्विकारणार आहेत. विप्रोचे मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी आबिदअली नीमचवाला यांच्याकडून ते या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. 6 जुलै 2020 ते 5 जुलै 2025 या कालावधीसाठी त्यांची नियुव्ती करण्यात आली आहे. डिलपार्टे यांना 1.1 ते 1.4 मिलियन युरोच इतके मूळ वेतन मिळणार आहे. त्याशिवाय 17 ते 25 लाख युरो त्यांना परिवर्तनीय वेतन म्हणून दिले जाणार असल्याचे शेअर होल्डरला दिलेल्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय फ्रान्स आणि हिंदुस्थानबाहेर काम करण्यासाठी त्यांना साधारणपणे 4 लाख 28 हजार ते 5 लाख 50 हजार इतका प्रवासी भत्ता देण्यात येणार आहे. एकूण दोन टप्प्यात मिळणार आहे. पहिल्या टप्पा अंतर्गत 31 जुलै 2020 रोजी 15 लाख डॉलर देण्यात येणार आहे. तर दुसऱया टप्पा 31 जुलै 2021 रोजी देण्यात येणार आहे. डेलपार्टे हे या अगोदर फ्रेंच आयटी कंपनी केपजेमिनीमध्ये कार्यकारी अधिकारी म्हणून काम करत होते. विप्रोचे सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अबिदअली नीमचवाला यांना त्यांच्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत सुमारे 32 कोटी रुपये इतका पगार मिळाला होता.





























































