
नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. 1 एप्रिल 2026 पासून प्रमुख बँकिंग एटीएम व्यवहारांच्या नियमांमध्ये आणि शुल्कामध्ये मोठे बदल होणार आहेत. डेबिट कार्ड आणि क्यूआर कोडच्या माध्यमातून एटीएममधून पैसे काढण्याची सीमा, ट्रान्झेक्शन चार्ज आणि वापर करण्याच्या पद्धतीत बदल होतील. नवे नियम मुंबई, नवी दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता अशा मेट्रो शहरांत लागू होतील.
फ्री यूपीआय ट्रान्झॅक्शन लिमिट – एचडीएफसी बँकेने एक मोठा बदल केला आहे. त्यानुसार आता यूपीआय वापरून एटीएममधून काढलेली रोख रक्कम तुमच्या मोफत व्यवहार मर्यादेमध्ये समाविष्ट केली जाईल. याचा अर्थ असा की, जर तुम्ही पूर्वनिश्चित मोफत मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार केले, तर तुम्हाला प्रत्येक अतिरिक्त व्यवहारासाठी 23 रुपये अधिक कर भरावा लागेल. पूर्वी यूपीआयद्वारे रोख रक्कम काढणे वेगळे मानले जात होते, परंतु आता ते नियमित एटीएममधून पैसे काढण्यासारखेच असेल.
रोख काढण्याचा नियम बदलला
पीएनबीने अनेक डेबिट कार्डांसाठी दैनंदिन रोख रक्कम काढण्याची मर्यादा कमी केली आहे. काही कार्डांवरील मर्यादा 1 लाखवरून 50 हजार रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे, तर प्रीमियम कार्डांवरील मर्यादा रुपये 1.5 लाखवरून 75 हजार रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे. मोठी रक्कम काढण्यासाठी अनेक वेळा एटीएमला भेट द्यावी लागू शकते.
एटीएमचे नियम बदलले
बंधन बँकेनेही एटीएम वापराचे नियम बदलले आहेत. तुम्हाला तुमच्या स्वतःच्या एटीएमवर दरमहा पाच मोफत आर्थिक व्यवहार, मेट्रो शहरांमधील इतर बँकांच्या एटीएमवर तीन आणि नॉन-मेट्रो शहरांमध्ये पाच व्यवहार मिळतील. यानंतर प्रत्येक व्यवहारावर 23 रुपये (आर्थिक) आणि 10 रुपये (गैर-आर्थिक) शुल्क आकारले जाईल. खात्यात अपुऱ्या शिल्लकीमुळे व्यवहार अयशस्वी झाल्यास 25 रुपयांचे अतिरिक्त शुल्क आकारले जाईल.

























































