
सामना प्रतिनिधी । राहुरी
राहुरी तालुक्यातील सडे परिसरात रविवारी मध्यरात्रीनंतर दोन जनावरांवर वन्य प्राण्याने हल्ल्या केल्याची घटना घडली आहे. सडे येथील योगेश घोरपडे यांच्या जनावरांच्या गोठ्यात गायीचे वासरू बांधले होते. सकाळी वासरू जागेवर दिसले नाही. मात्र, गोठ्यात रक्त सांडलेले दिसल्याने वासरावर हल्ला झाल्याचा संशय आला. घोरपडे यांच्या घरापासून काही अंतरावर वासराचे जखमी झालेले मृत शरीर दिसून आले.
छाया चव्हाण या कुटुंबाने चरण्यासाठी सोडलेल्या मोकाट घोड्यावरही वन्य पाण्याने हल्ला केल्याचे उघड झाले. या दोन घटनांबाबत राहुरी वनविभागाला कळवण्यात आल्यावर वनक्षेत्रपाल एन.डी.पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल जी.एन.लोंढे, सुमिता आठरे, महादेव शेळके घटनास्थळी पोहचले आणि वन्य प्राण्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या घोडा आणि वासराचा पंचनामा केला. वांबोरी येथील पशुवैद्यकीय अधिकारी शेटे यांनी मृत जनावरांचे शवविच्छेदन केले.
सडे परिसरात वन्यप्राण्याच्या हल्ल्यात घोडा व वासरू ठार झाले आहेत. मात्र, हा हल्ला तरस, बिबट्या किंवा कोणत्या वन्य प्राण्याने केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही असे वनपाल जी.एन.लोंढे यांनी सांगितले. वस्तीवर तसेच गोठ्यात जनावरे बांधताना सुरक्षितता म्हणुन कुंपण घालण्याची खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. मोकळ्यावर जनावरांना सोडल्याने वन्यप्राण्याच्या हल्ल्याला आमंत्रण देण्यासारखे असल्याचेही त्यांनी सांगितले.




























































