जागेच्या न्यायनिवाड्यासाठी विरोध केल्यामुळे महिलेला कुटुंबीयांसह केले बहिष्कृत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आईच्या मालमत्तेचा न्यायनिवाडा जात-पंचायतीसमोर करण्यास विरोध केल्यामुळे संबंधित जातपंचायतीने महिलेसह तिच्या कुटुंबीयांना समाजातून एक वर्षासाठी बहिष्कृत केले आहे. त्याशिवाय वर्षांच्या आतमध्ये समाजात परत यायचे असल्यास 5 दारूच्या बाटल्या, 5 बोकड आणि 1 लाख रूपये दंड रोख देण्याची आश्चर्यकारक मागणी जातपंचायतीने केली आहे. याप्रकरणी कोर्ट-कचेरी केल्यास समाजातून कायमस्वरूपी बहिष्कृत करण्याची धमकी कुटुंबीयांना देण्यात आली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून सासवड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

सुरेश रतन बिनावत (वय 65), नंदू अत्राम रजपतू (वय 55), संपत पन्नालाल बिनावत (वय 56), मुन्ना रमेश कचरवत (वय 57), आनंद रामचंद्र बिनावत (वय 50), देवीदास राजू चव्हाण (वय 52), देवानंद राजू कुंभार (वय 51) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सीमा (नाव बदलले आहे) यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सीमा (नाव बदलले आहे) गृहिणी असून कुटुंबीयांसह धनकवडी परिसरात राहायला आहेत. त्यांची आईही धनकवडीत राहायला आहे. सीमाच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर दोन महिन्यांपासून आरोपी सुरेश बिनावत त्यांच्या आईला फोन करून जातपंचायतीमध्ये मालमत्तेचा निवाडा करण्याचे सांगत होता.

मात्र, त्यांनी मालमत्तेच्या निवाड्याला विरोध केल्यामुळे सुरेशला राग आल्यामुळे त्याने सीमा यांच्या आईला फोनवर शिवीगाळ केली. त्यामुळे त्या चक्कर येऊन पडल्या. त्यानंतर सीमा यांनी स्वतःचा व्हाईस रेकॉर्ड करून जागेसंदर्भात आईला कोणीही त्रास न देण्याच्या मेसेज त्यांच्या समाजाच्या ग्रुपवर व्हायरल केला. त्यामुळे सुरेशला राग आल्यामुळे त्याने जातपंचायतीचे मिटींग बोलावून सीमासह तिच्या बहिणींनी माफी मागण्यास सांगितले.

जातपंचायतीच्या मिटींगमध्ये सीमा आणि तिच्या कुटुंबीयांसह बहिणीला समाजातून एक वर्ष बहिष्कृत करण्याचा निर्णय घेतला. जर एक वर्षाच्या आतमध्ये जाती-समाजामध्ये परत यायचे असल्यास संबंधितानी पंचकमिटीली 5 दारूच्या बाटल्या, 5 बोकडे आणि 1 लाख रूपये दंड म्हणून द्यावा लागेल असे सांगितले.

वर्षाच्या आतमध्ये ते जातीमध्ये न आल्यास कायमस्वरूपी बहिष्कृत करण्याचा इशारा दिला. जो कोणी संबंधितांना मदत करेल, त्यांना जातीतून बहिष्कृत केले जाईल. त्यांना कोणीही कार्यक्रमाला बोलावू नका, असा व्हिडिओ काढून सीमा यांच्या कुटुंबीयांना पाठवित समाजातून बहिष्कृत केले आहे. याप्रकरणी सासवड पोलीस तपास करीत आहेत.