महिला ड्रग्ज पेडलरला अटक; तिसऱ्या मजल्यावरून पाइपलाइनने उतरून पळून जाण्याचा प्रयत्न

कोकेन कॅप्सूलच्या तस्करी प्रकरणात अटक असलेल्या महिला ड्रग्ज पेडलरने तिसऱ्या मजल्यावरून पाइपलाइनने उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. आलिशा केम असे ड्रग्ज पेडलर महिलेचे नाव आहे. या महिला ड्रग्ज पेडलरला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर पोलीस तिच्या घराचा पंचनामा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी तिने किचनमधील खिडकीतून बाहेर निघून पाइपलाइनच्या मदतीने उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तिच्या पुन्हा मुसक्या आवळल्या आहेत.

आलिशा केम ही सेक्टर 17 मधील उलवे येथील इमारतीत भाड्याच्या रूममध्ये राहात होती. मंगळवारी रिक्षात पर्स विसरलेल्या शमशाद बेगम या महिलेने तिला पर्सबाबत विचारणा केली असता आलिशाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शमशाद यांनी स्थानिकांच्या मदतीने तिचा पाठलाग करून पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी पोलिसांनी तपास केला असता पोलिसांना तिच्याकडून 43 लाखांचे कोकेन कॅप्सूल मिळून आल्या होत्या. तिने हे कोकेन कुठून आणले व तिच्याकडे आणखी किती प्रमाणात कोकेनचा साठा आहे याचा तपास करण्यासाठी पोलीस तिच्या घरी गेले होते. त्यावेळी तिने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तिचा प्रयत्न हाणून पाडला