
लग्नात मानपान केला नाही असे म्हणत पत्नीचा छळ करून तिला माहेरहून पैसे आणण्यासाठी तगादा लावला. त्याशिवाय शारिरीक आणि मानसिक त्रासाला कंटाळून महिलेने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना 25 एप्रिलला हांडेवाडीतील एक्झोटीका सोसायटीत घडली.
दिव्या तरूण कानडे (वय 24 रा. हांडेवाडी, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तरूण कानडे याच्यासह इतर नातेवाईकांविरूद्ध वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शामराव बनसोडे (वय 50 रा. गंगापूर, संभाजीनगर) यांनी तक्रार दिली आहे.
दिव्या आणि तरूण यांचे 1 जानेवारी 2021 मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर सासरच्या मंडळींसह पती तरूण हा दिव्याचा छळ करीत होता. तिच्याकडे दागदागिन्यांची मागणी करणे, पैशांसाठी शिवीगाळ करणे, लग्नात मानपान न केल्यामुळे टोमणे मारणे अशा छळाला कंटाळून दिव्याने राहत्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. सहायक पोलीस निरीक्षक दत्तप्रसाद शेंडगे तपास करीत आहेत.
























































