
पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट गोरेगाव लोकलमध्ये महिला डब्यात एका महिला तिकीट तपासनीसाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. एका महिला प्रवाश्यानेच तिकीट तपासनीसाला मारहाण केली असून तिला ताब्यात घेण्यात आलं आहे.
सोमवारी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास चर्चगेटव ते गोरेगाव असा प्रवास करणाऱ्या लोकलमध्ये प्रथम वर्गाच्या महिला डब्यात एक तरुणी चढली. ही लोकल दादर स्थानकांवर आल्यानंतर त्याच डब्यात दोन महिला तिकीट तपासनीस चढल्या. त्यानंतर त्यांनी तिकीट तपासणी सुरू केली. त्या वेळी एका तरुणीकडे योग्य तिकीट नव्हते. त्यामुळे तिला दंड भरण्यास त्यांनी सांगितले. पण दंड भरायला नकार देऊन ती तरुणी महिला तिकीट तपासनीसाशी भांडू लागली. शाब्दिक बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. या तरुणीने तपासनीसाची कॉलर पकडून तिच्या श्रीमुखात भडकावली.
हा प्रकार पाहताच इतर महिला प्रवाशांनी आपत्कालीन साखळी ओढली. त्यामुळे माहीम ते वांद्रे स्थानकांदरम्यान लोकल थांबली. त्या वेळीही हा वाद सुरूच होता. वांद्रे स्थानकात ही लोकल आल्यानंतर या तरुणीला स्थानकावर उतरवण्यात आलं आणि पोलिसात नेण्यात आलं.






























































