
गाझियाबादमध्ये राहणाऱया दीपाली त्यागी या महिलेने अमेरिकन पिझ्झा कंपनीवर दावा ठोकत एक कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
व्हेज पिझ्झाची ऑर्डर दिलेली असताना नॉनव्हेज पिझ्झा दिल्याने दीपालीने कंपनीला ग्राहक कोर्टात खेचले आहे. आपण शुद्ध शाकाहारी असून कंपनीच्या चुकीमुळे मांसाहारी पिझ्झा खावा लागला. त्यामुळे आपल्या धार्मिक परंपरांचा भंग झाला असा आरोप दीपालीने केला आहे. 21 मार्च 2019 रोजी घडलेल्या या प्रकरणाची सुनावणी येत्या 17 मार्च रोजी होणार आहे.
याबाबत दीपाली म्हणाल्या, ‘डिलिव्हरी बॉय दिलेली ऑर्डर घेऊन वेळेवर आला नाही. तो जवळपास 30 मिनिटे उशिरा आला. तरीही मी त्याकडे दुर्लक्ष केले आणि पिझा उघडून खाण्यास सुरुवात केली. भूक लागली असल्याने पटकन खाण्यास सुरुवात केली. मात्र, खाल्ल्यानंतर त्यात सोयाबीन नसून मांसाचे तुकडे असल्याचे लक्षात आले.
दीपालीचे वकील फरगत कासरी यांनी ग्राहक न्यायालयात सांगितले की, हा प्रकार घडल्यानंतर दीपाली यांनी लगेच ग्राहक सेवा अधिकाऱयांना फोन केला होता आणि तक्रार केली होती. काही दिवसांपूर्वी पिझ्झा आऊटलेटच्या प्रबंधकांनी दिपाली यांना फोन केला होता आणि तक्रारदाराच्या संपूर्ण कुटुंबाला मोफत पिझ्झा देण्याची ऑफर दिली होती. ‘पण ते समजतात इतकं हे सोपं नाही. त्यांच्या या चुकीमुळे माझी वर्षानुवर्षाची धार्मिक व्रतं भंग झालीत आणि त्यामुळे मला मानसिक धक्का बसलाय,’ असे दीपालीने म्हटलंय. वकीलाच्या दाव्यानुसार, त्यांच्या अशिलाला मानसिक आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यांनी संपूर्ण आयुष्यभर उपचारांसाठी खर्च येऊ शकतो. सध्या या प्रकरणी न्यायालयाने पिझ्झा कंपनीला यावर उत्तर देण्यास सांगितले आहे.




























































