प्रियकरासाठी आईनेच केली मुलीची हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । हरदोई

प्रियकरासाठी एका आईने आपल्या पोटच्या मुलीची हत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशमधील हरदोईमध्ये उघडकीस आली आहे. मुलीची गळा चिरून हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी मुलीची आई, तिचा भाऊ आणि प्रियकराला अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

मुलगी तिच्या आईबाबत आणि तिच्या प्रियकराबाबत सर्वांसमक्ष बोलत असल्याने ती या संबंधांमध्ये अडसर ठरू नये, यासाठी आईनेच तिची हत्या केली आहे. ही घटना 22 ऑक्टोबरला घडली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून तपासासाठी पथक नेमले होते. पथकाने जलद गतीने तपास करत आठवड्याभरातच या हत्येचा उलगडा केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी मुलीची आई संतोषी, तिचा भाऊ आणि तिचा प्रियकर अभिमन्यू यांना अटक केली आहे. त्यांनी हत्येसाठी वापरलेला चाकूही जप्त करण्यात आला आहे.

संतोषी आणि अभिमन्यू यांचे प्रेमसंबंध होते. अभिमन्यू नेहमी संतोषीच्या घरी येत होता. ते दोघे अनेकदा एका खोलीत असत, नशेमध्ये अभिमन्यू मुलीचीही छेड काढायचा. ती त्याला विरोध करत होती. तसेच याबाबत सर्वांसमक्ष बोलत होती. त्यामुळे मुलगी आपल्या संबंधांमध्ये अडसर ठरत आहे, असे संतोषीच्या लक्षात आल्याने तिने भाऊ आणि अभिमन्यूच्या मदतीने मुलीची गळा चिरून हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.