
सामना प्रतिनिधी । परभणी
उसने पैसे परत करूनही पोलिसांत दिलेली तक्रार मागे न घेतल्याच्या रागातून विवाहित महिलेची हत्या झाल्याची घटना मदिनानगर परिसरात घडली. शनिवारी पहाटे ही उघना उघडकीस आली. देवाण-घेवाणीच्या व्यवहारातील उर्वरीत पैशाच्या वादाबाबत नानलपेठ पोलीस ठाण्यात तीन वेळा तक्रार करुनही पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली नाही. त्यामुळे आरोपीचे मनोबल वाढून त्याने सुनीता धुमाळ या महिलेची निर्घृण हत्या केली आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही महिन्यांपूर्वी अजहर कुरेशी याने सुनीताकडून ६० हजार रुपये उसने घेतले होते. त्यातूनच दोघांमध्ये वादही निर्माण झाला होता. याच कारणातून १ जुलै रोजी अजहर कुरेशीने सुनीताला मारहाण केली होती. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर ३ जुलै रोजीही सुनीता यांना कुरेशीकडून मारहाण करण्यात आली होती. अजहर कुरेशी याने उसने घेतलेले पैसे परत केल्यानंतरही सुनीता यांनी तक्रार मागे घेतली नाही. त्यामुळे १० जुलै रोजी सुनीता यांना शिवीगाळ करुन मारहाण करण्यात आली. या प्रकरणातही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर ४ ऑगस्ट रोजी पहाटे ३.३० वाजता गच्चीवरुन ओरडण्याचा आवाज आला. गच्चीवर जाऊन बघितले असता, अजहर कुरेशी व इतर तिघांनी सुनीताला मारहाण केली होती. या मारहाणीतच सुनीता यांचा मृत्यू ओढवला.
उसने दिलेले ६० हजार रुपये परत मागितले आणि पोलीस ठाण्यात तक्रार केल्याच्या कारणावरुन सुनीताला मारहाण करुन तिची हत्या करण्यात आली, असे असे सुनीताची नातेवाईक निकीता पवार यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यावरुन नानलपेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.


























































