
सामना प्रतिनिधी, वसई
वसई पूर्व सायवन येथील जंगलात मंगळवारी (दि.16) एका विवाहितेची निर्घृण हत्या झाली होती. सदर गुन्ह्याचा पोलिसांनी शोध घेतला असता एका नराधमाने शरीरसुखाची मागणी विवाहितेकडे केली असता तिने ती धुडकावली होती. त्यामुळे आपली बदनामी होईल या भीतीने नराधम तरुणाने तिची हत्या केली. अवघ्या 36 तासांत या हत्याकांडाचे कोडे उलगडण्यास पोलिसांना यश आले आहे.
याबाबत उपलब्ध माहितीनुसार सायवन जवळील वनविभागाच्या जागेत सोमवारी (दि. 15) मयत अनिता अंकुश मडके (वय 40) ही विवाहित महिला कामानिमित्त दुपारी 1:30 वाजता एकटीच गेली होती. त्यावेळी राजेश बाळू पवार या व्यक्तिने निर्जन जागेत तिची वाट अडवून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. त्याच्या मागणीला नकार देत तिने याबाबत आपल्या पतीला व गावातील लोकांना सांगणार असल्याचे तिने सांगताच, घाबरलेल्या राजेश पवार याने आपल्याकडील खेकडे पकडण्याच्या कटावणीने अनितावर प्राणघातक हल्ला चढवला व तिची हत्या केली. त्याचप्रमाणे ही हत्या चोरीसाठी केल्याचा बनाव दिसावा यासाठी तिच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून नेले.
शेतीच्या कामासाठी गेलेली आपली पत्नी जंगलातून परतली नसल्यामूळे अंकुश मडके यांनी तिचा शोध घेतला असता अनिताचा मृतदेह जंगलात निर्जन स्थळी आढळून आला होता. याबाबत त्याने विरार पोलीस ठाण्यात मंगळवारी तक्रार दाखल केली होती. सदर हत्याकांडाबद्दल पोलिसांना कोणताही पुरावा घटनास्थळी सापडला नव्हता. याबाबत पोलिसांनी विविध पथके तैनात करून आरोपीचा शोध सुरू ठेवला. यादरम्यान वनविभागाच्या जागेत शेतीची कामे करण्यासाठी कोण लोक जात आहेत याची माहिती घेतली असता आरोपी राजेश बाळू पवार याचे नाव समोर आले. त्याला सायवन येथून ताब्यात घेतले असता त्याने आपण मयत विवाहित महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली असता तिने नकार दिल्याने तसेच याबाबत गावात वाच्यता करणार असल्याचे सांगितल्याने घाबरून तिची हत्या केल्याचे कबूल केले. पोलिसांनी आरोपी राजेश पवार याला अटक केली असून विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल दबडे करीत आहेत.

























































