विवाहित महिलेची बॉयफ्रेंडने केली हत्या, तोंडात स्फोटके भरून उडवला जबडा

कर्नाटकमधील मैसूर जिल्ह्यात राहणाऱ्या एका 20 वर्षीय विवाहितेची तिच्या बॉयफ्रेंडने निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. रक्षिता असे त्या महिलेचे नाव होते. रक्षिताच्या नराधम बॉयफ्रेंडने तिच्या तोंडात स्फोटके भरून तिचा जबडा उडवला होता. यात तिचा मृत्यू झाला.

रक्षिता ही तिच्या पतीसोबत गेरासनाहल्ली गावात राहायची. तिचे त्याच गावात राहणाऱ्या सिद्धाराजूसोबत अनैतिक संबंध होते. रक्षिताचा नवरा हा कामानिमित्त बाहेरगावी असायचा. त्यानिमित्ताने रक्षिता सिद्धाराजूसोबत लॉजवर जायची. असंच रविवारी देखील ती त्याच्यासोबत शेजारच्या गावातील लॉजवर गेली होती.

तिथे रक्षिता व सिद्धाराजू यांच्यामध्ये वाद झाला. त्यानंतर सिद्धाराजूने रक्षिताचे हात बांधून तिच्या तोंडात जिलेटीनसारखी स्फोटके भरली व त्याला पेटवून दिलं. यात रक्षिताचा जबडा फुटला व ती रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडली.

त्यानंतर त्याने लॉजच्या लोकांना आरडाओरड करून बोलावून घेतले. सिद्धाराजू याने स्वत:चा बचाव करण्यासाठी रक्षिताच्या मोबाईलचा स्फोट झाल्याचा बनाव केला. लोकांची गर्दी जमल्यानंतर सिद्धाराजू तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर त्याने गुन्हा कबूल केला.