महाराष्ट्राच्या कुस्तीक्षेत्रात आणखी एक सुवर्णाध्याय लिहिला जाणार आहे. कारण आता पुरुषांप्रमाणेच महिलांच्याही ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा थरार कुस्तीशौकिनांना बघायला मिळणार आहे. सांगलीत 23 व 24 मार्चला ही पहिली ‘महिला महाराष्ट्र केसरी’ स्पर्धा रंगणार असून 34 जिल्हे आणि 11 महानगरपालिका असे एकूण 45 संघ या प्रतिष्ठsच्या स्पर्धेचा आखाडा गाजविण्यासाठी सज्ज झाले आहेत.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे महासचिव बाळासाहेब लांडगे, कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते, ‘अर्जुन’ पुरस्कारप्राप्त काका पवार आणि पुणे शहर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष अमोल बराटे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष दयानंद भक्त, परिषदेचे वकील तुषार पवार, मुरलीधर टेकुलवार, ललित लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
सांगली जिल्हा तालीम संघाला महिलांच्या या पहिल्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेच्या आयोजनाचा मान मिळाला आहे. मॅटवर होणारी ही स्पर्धा दहा वजनी गटासह खुल्या गटात रंगणार आहे. स्पर्धेत 50, 53, 55, 57, 59, 62, 68, 72 आणि 76 वजनी गटातील महिला मल्ल आखाडय़ात आपले काwशल्य पणाला लावतील. ‘महाराष्ट्र केसरी’ गटात 65 किलोहून अधिक वजनी गटातील मल्ल मानाची चांदीची गदा जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावताना दिसतील.
सांगलीला महिलांच्या पहिल्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचे यजमानपद मिळाल्याने आम्ही खूश आहोत. पुरुषांप्रमाणेच या स्पर्धेतही विजेत्या महिला कुस्तीपटूला मानाची चांदीची गदा दिली जाणार आहे. याचबरोबर विविध वजनी गटांतील विजेत्यांनाही रोख पारितोषिके दिली जातील. ही स्पर्धा संस्मरणीय ठरविण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करू.
– नामदेवराव मोहिते, अध्यक्ष, सांगली जिल्हा तालीम संघ
इचलकरंजीत कुमार तर पुण्यात ग्रीको
इचलकरंजी येथे 25 व 26 मार्च रोजी कुमार गटाच्या राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा होणार आहे. याचबरोबर पुणे जिह्यात वरिष्ठ गटाच्या राज्यस्तरीय ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धा 27 व 28 मार्च रोजी पुण्यातील मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलात होतील.
ती ‘महाराष्ट्र केसरी’ अनधिकृतच!
कोथरूड येथे जानेवारीत झालेली 65 वी ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा ही एक निमंत्रित स्पर्धा होती. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची त्या स्पर्धेला मान्यता नव्हती. न्यायालयाने अस्थायी समितीच अनधिकृत ठरवली आहे. त्यामुळे ती ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धा ही अधिकृत होऊ शकत नाही. परिषदेच्या वतीने ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल.




























































