
सामना प्रतिनिधी। संभाजीनगर
छावणी परिषदेत सफाई कामगार असलेल्या एका २८ वर्षीय महिला कर्मचाऱ्याने स्वच्छता निरीक्षकावर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे. यासंबंधी तिने जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे तक्रारही केली आहे.
छावणी परिषदेत काही महिन्यांपूर्वी महिलेची सफाई कामगार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हापासून वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक मिलिंद ढाकणे हे तिचा लैंगिक छळ करत होते. अश्लील शेरेबाजी करणे, सोबत फिरायला येण्याची मागणी करणे, अश्लिल इशारे करण्याबरोबरच ते शारीरिक सुखाची मागणी करायचे असा आरोप पीडित महिलेने तक्रारीत केला आहे. याबद्दल स्थानिक नगरसेवकांना सांगून या प्रकरणी समज देण्याची विनंती पीडितेने केली होती. त्यानंतर नगरसेवकांनी त्याला समजही दिली. पण त्यामुळे ढाकणे अधिकच चिडला व माझी तक्रार करते काय? असे म्हणत त्याने पुन्हा महिलेचा छळ करण्यास सुरुवात केली. या प्रकरणी छावणी कार्यालयाअंतर्गत विशाखा समितीकडे तक्रार करून ढाकणे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी पीडितेने निवेदनाद्वारे केली आहे.
दरम्यान, याबाबत जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे लेखी तक्रार केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत चौकशीचे आदेश स्थानिक निवारण समितीस दिले. याबाबत चौकशी करण्यासाठी बुधवारी जिल्हा दक्षता अधिकारी नीलेश दहिकर यांनी छावणी कार्यालयात विशाखा समितीच्या अध्यक्षा वैशाली केनेकर यांची भेट घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.


























































