
सामना प्रतिनिधी । जालना
जालना शहरातील कन्हैयानगर भागात मागील दीड महिन्यांपासून पाणी पुरवठा न झाल्यामुळे नागरिकांसह रणरागिनी रस्त्यावर उतरुन पालिकेच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करत तब्बल दीड तास रस्ता रोको आंदोलन केल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता. जालना शहरात प्रचंड पाणीटंचाई पाहायला मिळत आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्या जायकवाडी-जालना पाणीपुरवठा योजनेतून पाणीचोरी होत असल्याने जालना शहरातील नागरीकांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
शहरातील कन्हैयानगर भागात गेल्या दीड महिन्यांपासून नळाला पाणी न आल्याने संतप्त झालेल्या महिला आणि नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे एक ते दीड तास देऊळगाव राजाकडे जाणारी वाहतुक विस्कळीत झाली होती. यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. तत्काळ पाणी सोडा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करू असा इशारा नागरिकांनी दिला आहे. जालना शहराला मागील दोन महिन्यांपासून घरघर लागली आहे. नागरिकांना विकत पाणी घ्यावे लागत आहे. विकत पाणी परवडत नसलेल्या सर्व सामान्य नागरिकांत प्रचंड राग व्यक्त करण्यात येत असून जालना शहरातील अनेक भागातील नागरिक असेच आंदोलन करण्यात येणार असल्याचे नागरिकांतून सांगण्यात येत आहे.
































































