हिंदुस्थानचा जोशपूर्ण विजय, रिचा घोष -हरमनप्रीत कौरची खणखणीत भागी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रिचा घोषच्या 32 चेंडूंतील 44 धावांच्या घणाघाती खेळीने हिंदुस्थानला महिला टी-20 वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडीजविरुद्ध जोशपूर्ण विजय मिळवून दिला. विंडीजचे 119 धावांचे आव्हान हिंदुस्थानी महिला संघाने 11 चेंडू आणि 6 विकेट राखून सहजगत्या पार पाडले. अवघ्या 15 धावांत 3 विकेट टिपणारी दीप्ती शर्मा आजच्या विजयाची शिल्पकार ठरली.

रविवारी पाकिस्तानविरुद्ध दणदणीत सलामी दिल्यानंतर आज वेस्ट इंडीजविरुद्ध हिंदुस्थानची फलंदाजी काहीशी अडखळली होती, पण रिचा शर्मा आणि हरमनप्रीत जोडीने ती सावरली. विंडीजच्या 119 धावांचा पाठलाग करताना हिंदुस्थानला 3 धावांत 2 धक्के असे बसले की पूर्ण संघच हादरला. सलामीच्या लढतीत खेळू न शकलेली स्मृती मानधना 2 चौकारानंतर यष्टीचीत झाली. शेफाली वर्माबरोबर 3.3 षटकांत 32 धावांची सलामी दिल्यानंतर ही जोडी फुटली. स्मृती बाद होताच अवघ्या 3 धावांनी पाकिस्तानविरुद्ध जबरदस्त फलंदाजी करणारी जेमिमा रॉड्रिग्ज मॅथ्यूजची शिकार ठरली. जेमिमा केवळ एकच धाव करू शकली. हे धक्के सहन होत नाही तोच शेफीलीची 5 चौकारांसह केलेली 28 धावांची खेळी रामहरॅकने संपवली आणि हिंदुस्थानची 3 बाद 43 अशी बिकट स्थिती झाली.

रिचा-हरमनचा जोरदार खेळ

7 षटकांत 3 फलंदाज बाद झाल्यामुळे हिंदुस्थानच्या गोटात अस्वस्थता पसरली. पण नवव्याच षटकांत कर्णधार हरमनप्रीत काwरने फ्लेचरच्या दोन चेंडूंना सलग सीमापार धाडून संघावरचा ताण कमी केला. या षटकांत रिचानेही 7 धावा काढल्यामुळे हिंदुस्थानच्या धावसंख्येत 16 धावांची भर पडली. यानंतर या दोघांनी कोणताही धोका न पत्करता हिंदुस्थानचा धावफलक हलता ठेवला. दोघांनी इतका आत्मविश्वासपूर्ण खेळ करीत आधी विजय हिंदुस्थानच्या आवाक्यात आणला. या दोघीच संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब करणार तोच शिनेल हेन्रीने हरमनप्रीतला बाद केले. दोघींनी पाचव्या विकेटसाठी 72 धावांची भागी रचली. मग रिचाने 18 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर शमिला कॉनेलला चौकार ठोकून हिंदुस्थानच्या सलग दुसऱया विजयाची नोंद केली.

त्याअगोदर स्टेफनी टेलर (42) आणि शिमेन पॅम्पबेल (30) यांनी दुसऱया विकेटसाठी केलेल्या 73 धावांच्या भागीमुळे वेस्ट इंडीज सुस्थितीत होता, पण सामन्यातल्या 14 व्या षटकांत दीप्ती शर्माने 4 चेंडूंत या दोघींना बाद करून विंडीजचा जबर हादरा दिला. या धक्क्यामुळेच विंडीजची मजल 20 षटकांत 6 बाद 118 पोहचू शकली. दीप्ती शर्माने 15 धावांत 3 विकेट घेत सर्वोत्तम कामगिरी केली. तिच्या प्रभावी माऱयामुळेच वेस्ट इंडीजला 120 धावांच्या आत रोखण्यात हिंदुस्थानला यश लाभले.