
19 वर्षांखालील युवतींच्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत हिंदुस्थानने स्कॉटलंडचा धुव्वा उडवत गटात अव्वल स्थान पटकावले आणि स्पर्धेच्या सुपर सिक्समध्ये थाटात प्रवेश केला. तसेच ‘अ’ गटातून बांगलादेशही सलग तीन विजयांसह सुपर सिक्समध्ये पोहोचला.
आजही हिंदुस्थानी डावाला सावरले ते सलामीला आलेल्या त्रिशा गोंगडीने. गेल्या दोन्ही सामन्यांत झंझावाती खेळी करणारी कर्णधार शेफाली वर्मा आज अवघ्या एका धावेवर बाद झाली. तिच्यापाठोपाठ सोनिया मेंढियानेसुद्धा (6) निराशा केली. मात्र त्यानंतर रिचा घोषबरोबर 70 धावांची भागी रचली. स्कॉटलंडच्या प्रेझरने तीन चेंडूंत या जोडीला तंबूत धाडले. मग आलेल्या श्वेता सेहरावतने स्कॉटिश गोलंदाजांना आपला दणका दाखवत 10 चेंडूंत 4 चौकार आणि 2 षटकार ठोकत नाबाद 31 धावा ठोकल्या आणि संघालाही 149 धावापर्यंत नेले. या दोघींनी 19 चेंडूंत 44 धावांची अभेद्य भागी रचली.
त्यानंतर फलंदाजीला आलेल्या स्कॉटिश खेळाडूंना मन्नत कश्यप आणि अर्चना देवीने उभेही राहू दिले नाही. सलामीला आलेल्या एलसा लिस्टर (14) आणि डर्सी कार्टरने (24) सावध सुरुवात करून दिली, पण या दोघींना फार मोठी खेळी करता आली नाही. मात्र या दोघी बाद झाल्यावर स्कॉटलंडच्या डावात एकही फलंदाज दोन अंकी धावा करू शकला नाही.
बांगलादेशचाही सलग विजय
हिंदुस्थानप्रमाणे बांगलादेशच्या युवतींनीही अमेरिकेविरुद्ध 5 विकेट्सनी विजय मिळवित सलग तिसरा विजयासह सुपर सिक्समध्ये स्थान मिळविले. अमेरिकेने 4 बाद 103 धावा केल्या होत्या, तर बांगलादेशने हे लक्ष्य 15 चेंडू राखून गाठले. या स्पर्धेत गटात अव्वल ठरलेले संघ थेट सुपर सिक्समध्ये धडक मारतील आणि गटात दुसऱ्या स्थानावर असलेल्या चार संघांमध्ये सुपर सिक्समध्ये पोहोचण्यासाठी लढत होईल. विजयी दोन संघ सुपर सिक्स खेळतील.




























































