महिला विश्वचषक स्पर्धा; हिंदुस्थानसमोर आज वेस्ट इंडीजचे तगडे आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध दारुण पराभव  पत्करावा लागल्यानंतर महिला टीम इंडिया आज बलाढय़ वेस्ट इंडीजशी भिडणार आहे. परंपरागत प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर हिंदुस्थानी महिला संघाचा  आत्मविश्वास उंचावला होता. मात्र दुसऱया सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने दिलेले तगडे आव्हान पेलताना हिंदुस्थानची पूर्ण दमछाक झाली. तर दुसरीकडे सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांत विजय मिळवलेल्या वेस्ट इंडीजचे कडवे आव्हान हिंदुस्थानपुढे असणार आहे. विश्वचषकाचा इतिहास पाहता वेस्ट इंडीजविरुद्ध टीम इंडियाची बाजू वरचढ आहे. विश्वचषकात वेस्ट इंडीज हिंदुस्थानला एकदाही पराभूत करू शकलेला नाही. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत झालेले सहा सामने हिंदुस्थानने जिंकले आहेत. त्यामुळे उद्या शनिवारी होणाऱया सामन्यात कोणाचे पारडे जड राहणार हे पाहण्याजोगे असणार आहे.

न्यूझीलंड येथे सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेची हिंदुस्थानी महिलांनी जोरदार सुरुवात केली होती. परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर पहिल्या सामन्यात हिंदुस्थानने 107 धावांनी दणदणीत विजय मिळवला होता. मात्र त्यानंतर दुसऱया  सामन्यात यजमान न्यूझीलंड संघाकडून हिंदुस्थानला मोठा पराभव पत्करावा लागला.

आज हिंदुस्थानला विजय हवाच!

हिंदुस्थानी संघ सध्या गुणतालिकेमध्ये पाचव्या स्थानावर आहे. त्यामुळे उद्या वेस्ट इंडीजविरुद्ध होणारा हा सामना हिंदुस्थानसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे शनिवार, 12 मार्च रोजी होणाऱया वेस्ट इंडीजविरुद्ध संघातील वरिष्ठ खेळाडूंना साजेशी खेळी करावी लागेल. विंडीजविरुद्ध विजय मिळवून टीम इंडियाला स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखता येणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात हिंदुस्थानची आघाडीची फळी पुन्हा एकदा अपयशी ठरली. त्यांना पहिल्या 20 षटकांत केवळ 50 धावा करता आल्या. संघातील मिताली राज, स्मृती मंधाना  आणि झुलनसारख्या ज्येष्ठ खेळाडूंनी आता अतिरिक्त जबाबदारी घेऊन सामने जिंकावे लागतील. त्यामुळे युवा खेळाडूंवर दडपण येणार नाही.