कर्वेनगर, खडकी बाजारमध्ये महिलांच्या सोनसाखळी हिसकाविल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरातील विविध भागांत दुचाकीस्वार चोरट्यांकडून महिलांना लक्ष्य केले जात आहे. कर्वेनगर आणि खडकी बाजारामध्ये महिलांचे दागिने हिसकावून नेत पळ काढल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. त्याशिवाय बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन मोबाईल हिसकावून नेल्याचेही प्रकार उघडकीस आले आहेत. दिवसाढवळ्या होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिक भीतीखाली आहेत.

पतीसह रस्त्याने पायी चाललेल्या महिलेचा दुचाकीवर पाठलाग करून त्यांच्या गळ्यातील 1 लाखांचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून नेले. ही घटना काल रात्री सव्वाआठच्या सुमारास कर्वेनगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी महिलेने वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक रायकर तपास करीत आहेत. दुसऱ्या घटनेत बाजारात घरगुती साहित्य आणण्यासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील 76 हजारांची सोन्याची चेन दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेली. भरदिवसा खडकी बाजारातील भाजी मंडईसमोरील रस्त्यावर घडलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी हंबीरनाथ दशरथ सुकाळे (28, रा. भोसरी) याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रताप गिरी तपास करीत आहेत.

तृतीयपंथीने हिसकाविला मोबाईल
पुणे-दुचाकीवर घरी चाललेल्या तरूणाला थांबवून एका तृतीयपंथीने त्यांचा सहा हजारांचा मोबाईल हिसकावून नेला. ही घटना दोन दिवसांपुर्वी रात्री साडेदहाच्या सुमारास साधु वासवानी चौकात घडली. याप्रकरणी तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्याशिवाय दुसऱ्या घटनेत दुचाकीस्वार चोरट्यांनी तरुणाचा चावा घेऊन सहा हजारांचा मोबाईल चोरून नेला. ही घटना गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास पुणे रेल्वे स्टेशनकडून अलंकार चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली. याप्रकरणी अतुल लोंढे (38, रा. पद्मावती) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मागील काही दिवसांपासून बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल चोरीसह किरकोळ चोरीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पोलिसांनी गस्त वाढवून संरक्षण देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.