
हिंदुस्थानी महिला क्रिकेटपटूंत गुणवत्तेची कमतरता नाही. ती विकसित करणे ही काळाची गरज आहे. म्हणूनच मी हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) विनंती करतो की त्यांनी पुरुषांप्रमाणे महिलांचीही आयपीएल क्रिकेट स्पर्धा भरवावी. जेणेकरून आपल्या क्रिकेटर्सना जागतिक क्रिकेटचा अनुभव मिळेल. या अनुभवाच्या कमतरतेमुळेच आपण महिला टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पार अपयशी ठरलो, असा सल्ला ‘लिटल मास्टर’ सुनील गावसकर यांनी बीसीसीआयला दिला आहे. आपल्या महिला क्रिकेटर्सनी या पराभवाने खचून जाण्याची गरज नाही, असेही मत गावसकर यांनी व्यक्त केले.
हिंदुस्थानी महिला संघ टी-20 विश्वचषकाच्या साखळीत अफलातून खेळ करीत अंतिम फेरीत धडकला होता. पण रविवारी त्यांना अंतिम फेरीत अनुभवी यजमान ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला आणि उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. अंतिम फेरीतील आपल्या दारुण पराभव पाहता माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांना एक विनंती केली आहे.
गावसकर म्हणाले की, ‘मी बीसीसीआय आणि अध्यक्ष सौरभ गांगुली यांना एक विनंती करू इच्छितो की हिंदुस्थानात भरपूर गुणवत्ता आहे, पण जर महिला क्रिकेटमधील ही गुणवत्ता पुढे आणायची असेल तर त्यांच्यासाठी आयपीएलचे आयोजन करणे महत्त्वाचे आहे. महिलांचे आयपीएल सुरू झाले की, बरेच गुणवान खेळाडू पुढे येऊ शकतात. हिंदुस्थानात गुणवत्ता ठासून भरलेली आहे, पण त्या गुणवत्तेच्या विकासासाठी आपल्या क्रिकेटर मुलींना आयपीएलसारखे व्यासपीठ मिळायला हवे.’
महिलांची आठ संघांचीही आंतरराष्ट्रीय लीग होऊ शकते
जर महिलांच्या आयपीएलचे आयोजन करायचे झाले आणि आठ संघ निर्माण झाले नाही तरीही ही लीग खेळवता येऊ शकते. यामुळे गुणवत्तेला चांगले व्यासपीठ मिळेल. बीसीसीआय महिला क्रिकेटकडे चांगल्या पद्धतीने लक्ष देत आहे. त्यामुळे महिला क्रिकेटचा चांगला विकास आणि प्रसार होऊ शकतो, असे सांगून गावसकर म्हणाले की, ‘ऑस्ट्रेलियामध्ये महिलांसाठी बिग बॅश लीग खेळवली जाते. या लीगमध्ये हिंदुस्थानच्या हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधाना या दोघी खेळल्या होत्या आणि त्याचा त्यांना फायदाही झाला. जसा आयपीएलचा पुरुष खेळाडूंना फायदा मिळाला तसाच फायदा महिलांनाही होऊ शकतो.’




























































