
सामना प्रतिनिधी । चंद्रपूर
मागील तीन दिवसांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील चारशे कंत्राटी कामगार संपावर आहेत. चार महिन्याचे थकीत वेतन तसेच किमान वेतन या मागणीसाठी हे कामगार संपावर गेले आहेत. थकीत पगार व किमान वेतनाच्या मागणीसाठी सोमवारी या कामगारांनी जनविकासच्या नेतृत्वात महाशिवरात्रीनिमित्त भोलेनाथाला साकडे घातले. शासनाने मात्र अजूनपर्यंत कामगारांच्या काम बंद आंदोलनाची दखल घेतलेली नाही. जनविकास असंघटित कामगार कर्मचारी संघाने या कामगारांच्या मागण्यांसाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री, अर्थमंत्री, कामगारमंत्री, सचिव स्तरावरील विविध अधिकारी यांची भेट घेऊन सातत्याने कैफियत मांडली. जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला. आंदोलन केले, मोर्चे काढले परंतु कामगारांना थकीत पगार मिळाला नाही. त्याचप्रमाणे मागील अनेक महिन्यांपासून किमान वेतन लागू करण्यास वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासन जाणीवपूर्वक दिरंगाई करीत आहे.
थकीत पगार व किमान वेतनाच्या मागणीसाठी सोमवारी या कामगारांनी जनविकासच्या नेतृत्वात महाशिवरात्रीनिमित्त भोलेनाथाला साकडे घातले ज्याप्रमाणे सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात शासनाने तत्परता दाखवली, तशीच तत्परता कंत्राटी कामगारांच्या किमान वेतनाची अंमलबजावणी करण्यासाठी दाखवावी. सरकारला व अधिकाऱ्यांना सद्बुद्धी द्यावी या हेतूने कामगारांनी भोलेनाथाला साकडे घातले. तसेच सायंकाळी चार वाजता सद्बुद्धी आंदोलन, सद्बुद्धी यज्ञ करण्यात आला. यावेळी तारा धमके, सिंधू चौधरी, लता उईके, अमर राऊत या कामगारांनी शंकराचे पोहे म्हणून जुन्या काळातील आठवणींना उजाळा दिला. महादेवाने या सरकारला व अधिकाऱ्यांना सद्बुद्धी द्यावी आम्हाला आमचे थकित पगार व किमान वेतन मिळावे अशी मागणी कामगारांनी केली.






























































