जागतिक पुस्तक दिन,अनुवादित पुस्तकांचीच सर्वाधिक चर्चा

सामना ऑनलाईन,मुंबई

अनेक वर्षे उलटली तरी नॉट विदाऊट माय डॉटर, पॅपिलॉन, गॉडफादर, सत्तर दिवस अशा अनुवादित पुस्तकांना ग्रंथालयांत किंवा दुकानात आजही मोठी मागणी दिसून येत आहे. सोशल मीडियावरही अनुवादित पुस्तकांचीच चर्चा दिसून येत आहे. एखादे इंग्रजी पुस्तक बाजारात आले की, त्याची मराठी आवृत्ती कधी येणार, याबाबत विचारणा करणारेही वाढले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून अनुवादित पुस्तकांना मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिसादाने प्रकाशकही आश्चर्य व्यक्त करीत आहेत.

एकीकडे मराठी पुस्तकांना वाचक नसल्याची ओरड होत असताना इंग्रजीतून वा अन्य भाषांमधून मराठीत अनुवादित झालेल्या पुस्तकांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. त्यातही अनुवादित जुनी पुस्तके पुनः पुन्हा वाचली जात आहेत. त्यामुळे प्रकाशकांचा अनुवादित पुस्तके प्रकाशित करण्याकडे कल वाढत आहे. हलकीफुलकी, फारशी वैचारिक नसलेली कथा-कादंबरी वाचकांना भावत आहे. मेहता पब्लिकेशनतर्फे जास्तीत जास्त अनुवादित पुस्तके प्रकाशित केली जात आहेत. पुण्याच्या श्रीराम बुक एजन्सीसारखे प्रकाशक फक्त प्रसिद्ध इंग्रजी लेखकांची पुस्तके सीरिजमध्ये मराठीत आणत आहेत. बेट्टी महमुदीचे नॉट विदाऊट माय डॉटर, अमीश यांची शपथ वायुपुत्रांची, मेलुहांचे मृत्युंजय, रहस्य नागांचे,  हेन्री शॅरियर यांचे पॅपिलॉन आणि बँको, मारियो पुझोचे गॉडफादर रिटर्न्स तसेच बालसाहित्यात हॅरी पॉटर, फ्रँकलिनचा सेट, हॅनाची सुटकेस अशी अनेक पुस्तके वाचकांच्या पसंतीस उतरत आहेत. सर्व वयोगटातील वाचकांच्या अशा पुस्तकांवर उडय़ा पडत आहेत. आयटी क्षेत्रातील युवा वाचकांकडूनही मागणी आहे.

फेसबुक आणि व्हॉट्सऍपसारख्या सोशल मीडियावर पुस्तकप्रेमींनी एकत्र येऊन ग्रुप तयार केले आहेत. त्या ग्रुपमध्येही अनुवादित पुस्तकांच्या माहितीची देवाणघेवाण अधिक प्रमाणात होताना दिसते.

आम्ही फक्त अनुवादित पुस्तके प्रकाशित करतो. जगातील बेस्ट सेलर कादंबरी आम्ही मराठी भाषेत आणल्या आहेत. सिडने शेल्डन 19 कादंबरीची मालिका प्रकाशित केली आहे.  डेविड बल्डासी यांची सहा मराठी पुस्तके प्रकाशित केली आहेत, तर अजून चार पुस्तकांवर काम सुरू आहे. हेन्री शॅरिअलची पुस्तके, चार्लस बर्लिझचे ‘बर्म्युडा ट्रँगल’, रॉबिन कुकचे ‘गुडबाय हिटलर’, पिअर्स पॉल रिडचे ‘सत्तर दिवस’, डॅनियल स्टीलचे ‘मॅटर्स ऑफ द हार्ट’ ही पुस्तके गाजत आहेत. आम्ही वर्षभर प्रत्येक पुस्तकावर वाचकांना 25 टक्के सवलत देतो-विकास जगताप, श्रीराम बुक एजन्सी, पुणे

 

आपली प्रतिक्रिया द्या