‘विश्वचॅम्पियन’ सिंधूचे मायदेशात जोरदार स्वागत, पंतप्रधानांची घेतली भेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशीप जिंकल्यानंतर पी.व्ही. सिंधूचे मायदेशात जोरदार स्वागत करण्यात आले. सिंधून अंतिम फेरीमध्ये जपानच्या नोजोमी आकुहारा हिचा एकतर्फी झालेल्या लढतीत 21-7, 21-7 असा सरळ सेटमध्ये पराभव केला होता. मायदेशात परतल्यानंतर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमातळावर सिंधूभोवती चाहत्यांनी गराडा घातला. ‘विश्वचॅम्पियन’चा बहुमान पटकावलेल्या सिंधूने यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्रीडामंत्री किरण रिजिजू यांची भेट घेतली.

मंगळवारी पी.व्ही सिंधू हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी जगभरात हिंदुस्थानचा तिरंगा फडकावणाऱ्या सिंधूला मोदींनी ‘विश्वचॅम्पियन’चे पदक घातले. हिंदुस्थानसाठी हा गर्वाचा क्षण असल्याची प्रतिक्रिया मोदींनी यावेळी दिली. तसेच एका चॅम्पियनने सुवर्णपदक जिंकले असे म्हणत मोदींनी तिला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सिंधूसोबत यावेळी प्रशिक्षक फुलेला गोपिचंद आणि क्रीडामंत्री रिजिजूही उपस्थित होते.

10 लाखांचे बक्षिस
मोदींची भेट घेण्यापूर्वी सिंधूने क्रीडामंत्री किरण रिजिजू यांची भेट घेतली. क्रीडामंत्र्यांनी सिंधूचे अभिनंदन केले. तसेच विश्वचॅम्पियन सिंधूला 10 लाखांच्या बक्षिसाचा चेकही दिला.