विश्वचषक इंग्लंडने जिंकला, पण आम्ही पराभूत झालेलो नाही!

73

सामना ऑनलाईन, वेलिंग्टन

 यंदाचा आयसीसी विश्वचषक भले इंग्लंडने जिंकला असेल, पण विश्वचषकाच्या अंतिम लढतीत आम्ही पराभूत झालेलो नाही, अशी भावनिक प्रतिक्रिया उपविजेतेपद पटकावणाऱ्या न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियम्सन याने मायदेशी परतल्यावर व्यक्त केली आहे. फायनलमध्ये झुंजार खेळ करीत अखेरच्या क्षणापर्यंत यजमान इंग्लंडशी बरोबरी साधणाऱ्या न्यूझीलंडबद्दल जगभरातील सर्वच आजी-माजी क्रिकेटपटूंनी सहानुभूती व्यक्त केली आहे.

टाय लढतीतील सुपर ओव्हर्समध्ये पुन्हा मॅच टाय झाल्यावर केवळ इनिंगमधील चौकारांच्या संख्येवर इंग्लंडला विजेतेपद बहाल करण्याच्या आयसीसीच्या हास्यास्पद निर्णयावर आणि पंचांनी गप्टीलच्या ओव्हर थ्रोवर इंग्लंडला 6 धावा बहाल करण्याच्या निर्णयावर जोरदार टीका होत आहे.

विलियम्सनची खिलाडूवृत्ती

एखाद्या शिस्तबद्ध विद्यार्थ्यावर किवींचा कर्णधार केन विलियम्सनने आयसीसीच्या नियमांवर टिप्पणी न करता आपली भावना व्यक्त केली. तो म्हणाला, अंतिम लढतीत कुठलाही संघ हरलेला नाही, पण प्रघातानुसार कुणा एका संघाला विश्वचषक द्यायला हवाच. त्यामुळे तो इंग्लंडला दिला गेला. आम्हा दोन्ही संघांच्या खेळाडूंना अगोदर सुपर ओव्हरच्या नियमांची माहिती दिली गेली होती. त्यामुळे आता त्यावर चर्चा करणे योग्य नव्हे. मी विजेत्या इंग्लंडचे मनापासून अभिनंदन करतो, अशी खिलाडूवृत्तीची प्रतिक्रिया विलियम्सनने दिली. त्याच्या या दिलदार बाण्याचे जगभरातील क्रिकेटशौकीन कौतुक करीत आहेत.

यंदा आमच्यात आणि यजमान इंग्लंडमध्ये विश्वचषकाची चित्तथरारक लढत झाली. त्यात ‘ना तुम हारे, ना हम हारे’ अशीच स्थिती नियतीने आणली. आम्ही विचारही केला नव्हता की, अंतिम लढत एवढी रोमांचक आणि अनाकलनीय टप्प्यावर जाईल. पण असो, जगभरातील क्रिकेट चाहत्यांनी या लढतीचा मनमुराद आनंद लुटला यात आम्हाला सारे काही मिळाले- केन विलियम्सन, न्यूझीलंडचा कर्णधार

 

आपली प्रतिक्रिया द्या