
क्रिकेट वर्ल्ड कपची साखळी फेरी संपली असून या स्पर्धेचा आता उत्तरार्ध सुरू होणार आहे. हिंदुस्थान-न्यूझीलंड यांच्यात बुधवारी (दि. 15) उपांत्य फेरीचा थरार रंगणार आहे. त्यानंतर गुरुवारी (दि. 16) दक्षिण आफ्रिका-ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरी उपांत्य लढत होणार आहे. उपांत्य आणि अंतिम फेरीसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पाऊस पडला तरी लढतीचा निकाल लागणार आहे. बाद फेरीतील सामन्यांचा कुठल्याही परिस्थितीत निकाल लागण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) दोन नवीन नियम केले आहेत.
राखीव दिवशीही पाऊस पडला, तर…
अंतिम लढतीदरम्यान पावसाने खोडा घातला तर त्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे, मात्र राखीव दिवशीही पावसामुळे सामना होऊ न शकल्यास सामन्याचा निकाल हा गुणतक्त्यातील सरस कामगिरीवरून ठरणार नाहीये. अशा परिस्थितीत दोन्ही संघांना जगज्जेतेपदाचा करंडक विभागून दिला जाणार आहे.
लढत टाय झाली, तर…
उपांत्य आणि अंतिम लढत टाय झाली तर सुपर ओव्हरच्या नियमानुसार लढतीचा निकाल लागणार आहे. सुपर ओव्हरही टाय झाली तर आणखी एक सुपर ओव्हर होणार होईल. त्यामुळे विजेत्या संघाचा फैसला हा सुपर ओव्हरनेच लागेल.
सामना पावसात वाहून गेला, तर…
उपांत्य फेरीचा सामना पावसात वाहून केला तरी त्या लढतीचा निकाल लागणार आहे. कारण बाद फेरीतील प्रत्येक लढतीसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. त्यामुळे लढतीच्या दिवशी पाऊस आल्यास उर्वरित लढत दुसऱया दिवशी होणार आहे, मात्र राखीव दिवशीही पावसामुळे सामना होऊ शकला नाही तर मग निकाल हा साखळी फेरीच्या गुणतक्त्यातील सरस कामगिरीवरुन ठरणार आहे. त्यामुळे स्पर्धेत आतापर्यंत अजेय असलेल्या टीम इंडियाला याचा सर्वाधिक फायदा होणार आहे.



























































