चला संकल्प करूया!

2433

>> डॉ. सतीश नाईक

14 नोव्हेंबर हा दिवस मधुमेह दिन म्हणून साजरा केला जातो. खरंतर मधुमेहाबद्दल साजरं करावं असं काहीच नाही. त्यात रक्तातली ग्लुकोज वाढते. रक्ताचा शरीराच्या कुठल्याही भागात मुक्त संचार असतो. त्यामुळे मधुमेहापासून शरीराच्या कुठल्याही भागाला इजा होऊ शकते. अर्थात जितकी रक्तातली साखर जास्त वाढेल तितका शरीराला नुकसान होण्याचा धोका अधिक.  मात्र असं असलं तरी योग्य उपाययोजना करून मधुमेह नियंत्रणात राखणं शक्य असतं. 

मधुमेह सध्या संपूर्ण जगात धुमाकूळ घालतोय. तो जगातला सगळ्यात महत्त्वाचा आरोग्य प्रश्न ठरतोय. त्यावर दरवर्षी अब्जावधी डॉलर्स खर्च होताहेत. तरी देखील कित्येक लोकांचे पाय कापले जाताहेत. मूत्रपिंड निकामी होताहेत. हृदयरोग होऊन अत्यंत कमी वयात तरुणांचे जीव जाताहेत. प्रश्न इतका गंभीर झालाय की, लोकांचं लक्ष त्याकडे वेधलं जावं म्हणून  प्रत्येक वर्षी  14 नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा केला जातो. 

खरं म्हटलं तर मधुमेहाबद्दल साजरं करावं असं काहीच नाही. त्यात रक्तातली ग्लुकोज वाढते. रक्ताचा शरीराच्या कुठल्याही भागात मुक्त संचार असतो. त्यामुळे मधुमेहापासून शरीराच्या कुठल्याही भागाला इजा होऊ शकते. अर्थात जितकी रक्तातली साखर जास्त वाढेल तितका शरीराला नुकसान होण्याचा धोका अधिक. त्यातल्या त्यात शरीराची अत्यंत महत्त्वाची इंद्रियं म्हणजे हृदय, डोळे, मूत्रपिंड, यकृत, मेंदू आणि मज्जासंस्था, रक्तवाहिन्या यांना अपाय झाला की, सगळं आयुष्य विचित्र होऊन बसतं. शिवाय जोपर्यंत हे सर्व प्रश्न गंभीर रूप धारण करत नाहीत तोपर्यंत आपल्याला पत्ताही लागत नाही. दुखत खुपत नाही म्हणून आपण डॉक्टरांकडे जाण्याची टाळाटाळ करतो. एरवी साधी दातदुखी झाली की दातांच्या डॉक्टरांकडे हमखास जाणारे आपण काहीच त्रास होत नसल्यानं चांगलं चाललंय मग उगीच कशाला दवाखान्यात जा, असा विचार करून गप्प बसतो. डॉक्टरांनी एकदा लिहून दिलेली चिठ्ठी पुनः पुन्हा केमिस्टला दाखवून औषध घेत राहतो.

ही आपली सर्वात मोठी चूक आहे. मुळात त्रास होत नसताना मधुमेहाची औषधं घेण्याचं कारण एकदा का आपलं एखादं इंद्रिय निकामी झालं की त्यानंतर जगातले कुठलेही डॉक्टर ते इंद्रिय नवं करून देऊ शकत नाहीत. उदाहरणार्थ एखाद्याला हार्ट ऍटॅक आला आणि त्याने आपल्यावर इलाज करून घेतला तरी त्याला त्याचं उर्वरित आयुष्य त्याच इजा झालेल्या हृदयासोबत काढावं लागणार आहे हे त्याने लक्षात घेतलं पाहिजे. वेगळ्या शब्दांत सांगायचं तर एकदा मधुमेह झाला म्हणजे त्यापासून आपल्या कुठल्याही इंद्रियांना नुकसान पोहोचणार नाही याची दक्षता घेण्यासाठी आपण मधुमेहाचे उपचार करून घेतो. एकप्रकारे ही पुढच्या आयुष्यात मोठे आजार नकोत यासाठी रोकथाम व्हावी अशी उपाययोजना आपण करत असतो. Prevention is better than cure हे लक्षात घेऊन आपण औषधं घेत असतो. हे अनेक आजारांच्या बाबतीत खरं आहे. पुढे पोलियो होऊ नये म्हणून आपण लसी घेतो त्यातलाच हा प्रकार.

परंतु मधुमेहाच्या बाबतीत हे जास्तच खरं आहे. कारण मधुमेह हा आजार केवळ रक्तातली साखर वाढणं इतकाच मर्यादित नाही. तो मुळात एकटादुकटा कधी येतच नाही. सोबत रक्तदाब, कोलेस्टेरॉल यासारखा लवाजमा सोबत घेऊनच तो आपल्यावर हल्ला करतो. त्याच्यावर मात करायची तर फक्त रक्तातली साखर नियंत्रणाखाली ठेऊन काम भागणार नाही. रक्तदाब, कोलेस्टेरॉल यांचंही दमन करणं जरूरी आहे. शिवाय डोळे, पाय, हृदय, मज्जासंस्था, यकृत अशा शरीरातल्या महत्त्वाच्या इंद्रियांना संभाळणं आलं. त्यासाठी नियमित डॉक्टरांकडे जाणं, त्यांच्याकडून तपासून त्यावरचीही औषधं घेणं आलं.

तितकाच महत्त्वाचा विषय म्हणजे मधुमेहात मज्जासंस्थेवर होणार परिणाम. आपल्या संवेदनाच यात संपतात. पाय सुन्न होतात, एखादा खिळा पायात घुसला तरी त्याची वेदना जाणवत नाही. ती जागा पिकली, तिथं पू झाला तरच वेदना व्हायला सुरुवात होते. मग पायाची कापाकापी आली. जखम चिघळण्याची भीती आली. इथं हेही लक्षात घेतलं पाहिजे की, मधुमेहात फक्त पायाचीच संवेदना जाते असं नव्हे. हृदयाच्या संवेदनादेखील कमी होऊ शकतात. मग हृदयविकाराचा झटका आला तरी दुखत नाही. छातीत दुखत नाही म्हटल्यावर झटका आल्याचं कळतही नाही. काही समजायच्या आधी सायलेंट हार्ट ऍटॅक येऊन माणसाचा जीवदेखील गेलेला असतो. किंबहुना हे असं होतंय. अनेकांचे झोपेतच जीव जाताहेत.

हे सर्व वाचवायला हवं. त्याबाबत जनजागृती व्हायला हवी. केवळ साखरेवर केंद्रित न राहता आपण मधुमेहानं शरीराच्या कुठल्याच भागाला उपद्रव होणार नाही याची दक्षता आपण घ्यायला हवी. दर दोन-तीन महिन्यांनी ग्लुकोज तपासून ते व्यवस्थित आहे याची खात्री करून घ्यायला हवी. सोबत रक्तदाब, कोलेस्टेरॉल, मूत्रपिंडाबद्दल माहिती करून देणारी क्रिएटिनिनची तपासणी किमान वर्षातून एकदा तरी करायला हवी. आपला कार्डियोग्राम करून घ्यायला हवा. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपल्याला झालाय तर पुढच्या पिढीला तो होणार नाही या दिशेनं पावलं उचलायला हवीत.

असं झालं, मधुमेहाचे नवीन पेशंट निर्माण व्हायचे बंद झाले तर भविष्य उज्ज्वल होईल. आजच्या सारखे 14 नोव्हेंबरचे जागतिक मधुमेह दिन पाळण्याची गरज उरणार नाही. आज हे थोडंसं अतिशयोक्त वाटत असलं तरी किमान त्या दिशेनं पावलं उचलायला काय हरकत आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या