
जॉगिंग ट्रॅक, ओपन जीम, प्ले ग्राऊंड, लोकल इव्हेंटसाठी प्रशस्त जागा, बसण्याच्या सुविधेसह अत्याधुनिक पद्धतीने वरळी कोळीवाडा येथील डबकल मैदानाचा पालिकेच्या माध्यमातून लवकरच कायापालट होणार आहे. जिल्हा नियोजन विकास निधीमधून दीड कोटींचा खर्च या कामासाठी केला जाणार आहे. या अत्याधुनिक मैदानामुळे वरळीकरांना हक्काचे मनोरंजन मैदान उपलब्ध होणार आहे.
मुंबई स्वच्छ-सुंदर बनवण्यासाठी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि पालिकेच्या माध्यमातून अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये रस्ते, वाहतूक बेटे, मोठमोठय़ा पुलांखालील जागा, उद्याने-क्रीडांगणांना नवी झळाळी देण्यात येत आहे. मुंबईत सध्या सुमारे एक हजार उद्याने-क्रीडांगणे आणि मोकळ्या जागा आहेत. या उद्याने-मैदानांना नवे रूप देण्यात येत आहे. वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी उद्यानात मोफत वाचनालयाची सुविधाही उपलब्ध करण्यात येत असून सौंदर्यीकरणावर भर देण्यात येत आहे. यामध्ये वरळी कोळीवाडा गोल्फादेवी जवळील डबवल मैदानाचा कायापालट करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरु असल्याची माहिती जी/दक्षिण वॉर्डचे सहायक आयुक्त शरद उघडे यांनी दिली.
या मैदानात मल्टी स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीत कबड्डी, खो खो आदी खेळांसाठी जागा उपलब्ध करण्यात येणार असून जॉगिंग ट्रॅक, ओपन जीम, ज्येष्ठ नागरिकांसाठी मनोरंजन मैदान, लहान मुलांसाठी प्ले ग्राउंड, शौचालय उपलब्ध करण्यात येईल.
या शिवाय जॉगिंग ट्रॅकवर आकर्षक पेंटिंग करण्यात येणार आहे. मैदानावर टप्प्याटप्प्यावर झाडे, हिरवळ, फुलझाडे, शोभेची झाडे लावण्यात येईल. बसण्यासाठी पायऱयांच्या स्वरूपात बैठक व्यवस्था राहील. सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रस्तावित आहे.






























































