
मुंबई कोळीवाड्यासारख्या ठिकाणी प्रचंड दाटीवाटीची लोकवस्ती असतानाही पालिकेने केलेल्या उपाययोजनांमुळे वरळी परिसरात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात चांगले यश आले आहे. त्यामुळे केंद्रीय पथकाने तब्बल दोन वेळा भेट देऊन पालिकेच्या कामगिरीची दखल घेत ‘कोरोना लढ्या’चा वरळी पॅटर्न संपूर्ण देशभर राबवण्याचा मानस व्यक्त केला आहे.
पालिकेच्या जी-साऊथ म्हणजेच वरळी, लोअर परळ परिसरात सर्वाधिक म्हणजे 600 पेक्षा जास्त रुग्ण असले तरी रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही याच ठिकाणी सर्वाधिक आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे याच्या निर्देशानुसार पालिकेने कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळेच हे यश आले आहे. यामध्ये डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचार्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी ‘एनएससीआय’मध्ये आणि पोद्दार रुग्णालयात सुरू केलेल्या क्वॉरंटाइन केंद्रात अद्ययावत यंत्रणा सुरू केली आहे. यामध्ये रुग्णाचा डॉक्टर, नर्सशी संपर्क येत नसल्यामुळे आरोग्य कर्मचार्यांना होणार्या संसर्गाचे प्रमाण घटले आहे. याशिवाय रुग्ण सापडलेल्या परिसरात प्रवेश बंद, संसर्गाची साखळी शोधणे, शिस्तबद्ध क्वॉरंटाइन करणे, रुग्ण आढळल्यामुळे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केलेल्या क्षेत्रातील रहिवाशांना घरपोच अत्यावश्यक सेवा देणे अशा उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
संसर्ग टाळण्याचे तंत्रज्ञान यशस्वी
संसर्गाचा धोका टाळण्यासाठी ‘इन्स्टिट्युशनल क्वॉरंटाईन’चा पहिला प्रयोग वरळीमध्ये करण्यात आला. झाला. पोद्दार रुग्णालयाबरोबरच नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियाच्या (एनएससीआय) भव्य स्टेडियमवर पाचशे 500 खाटांचे ‘कोविड केअर सेन्टर’ सुरू करण्यात आले आहे. जी दक्षिण विभागाने मुंबईचे प्रसिद्ध डॉ. मुफ्फजल लकडावाला यांच्या मार्गदर्शनाखाली हा कक्ष तयार केला आहे. येथे रुग्णांच्या संपर्कात न येता डॉक्टरांमार्फत होणार्या प्रभावी उपचार पद्धतीचे कौतुक केंद्रातून आलेल्या विशेष पथकानेही केले आहे.
मनोरंजनामुळे प्रकृती सुधारणेस वेग
एनसीआय डोममध्ये सुरू केलेल्या क्वॉरंटाइन केंद्रात रुग्णांची काळजी घेण्यासाठी डॉक्टरांसह 50 जणांचे विशेष पथक 24 तास तैनात असते. वेळोवेळी रुग्णांची तपासणी करणे, आवश्यकता भासल्यास चाचणीसाठी घशाचा स्राव घेतला जातो. विशेष म्हणजे 14 दिवस येथे राहणार्या रुग्णांच्या मनोरंजनासाठी मोठ्या स्क्रीनवर मनोरंजनाचे कार्यक्रम, आरोग्याबाबत जनजागृती करणारे माहितीपट दाखवले जात आहेत. त्यामुळे रुग्ण-संशयितांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याचा वेग वाढला आहे.





























































