जनता त्रस्त! महागाईचा 9 वर्षांतील उच्चांक, घाऊक महागाई दर 15.88 टक्क्यांवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धान्य, अन्नधान्यपदार्थापासून पेट्रोल, डिझेलपर्यंत सर्वच वस्तुंची दरवाढ होत असल्यामुळे देशात महागाईने नऊ वर्षांतील उच्चांकी दर गाठला आहे. घाऊक महागाईचा दर 15.88 टक्क्यांवर गेला आहे. यामुळे किरकोळ बाजारातही महागाईचा आणखी भडका उडणार आहे.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार सलग 14 महिन्यांपासून घाऊक महागाईचा दर 10 टक्क्यांवर आहे. एप्रिलमध्ये 15.08 टक्के असणारा महागाईचा दर मे महिन्यात 15.88 टक्क्यांवर पोहोचला आहे. नऊ वर्षांतील सर्वाधिक महागाई दर आहे. गेल्यावर्षी मे 2021 मध्ये हा दर 13.11 टक्के होता. घाऊक महागाईचा परिणाम किरकोळ विक्री बाजारावर होतो. त्यामुळे किरकोळ महागाईचा दरही लवकरच भडकण्याची शक्यता आहे.

वाहतुकीचा खर्च वाढल्यामुळे महागाई

रिझर्व्ह बँकेने यापूर्वी आपल्या वार्षिक अहवालात वाढत्या महागाईबाबत म्हटले आहे की, इंधन दरवाढीमुळे व मालवाहतुकीचा खर्च वाढला. त्यामुळे अनेक वस्तुंची दरवाढ होत आहे.

भाजीपाला, गहू, तेलासह सर्वच महागले

–  मे महिन्यांत भाजीपाल्यांच्या किंमती 56.36 टक्क्यांनी वाढल्या.
–  गव्हाचे दर 10.55 टक्के, अंडी, मांस, मासळीची भाववाढ 7.78 टक्क्यांनी झाली आहे.
–  खाद्यतेलाचे दर 7.8 टक्क्यांनी वाढले.
–  स्वयंपाकाच्या गॅसचे दर 38.5 टक्क्यांवरून 47.7 टक्क्यांवर भडकले.
–  पेट्रोल, डिझेलच्या महागाईचा दर अनुक्रमे 65.2 टक्के आणि 58.8 टक्के आहे.

कर्जे आणखी महागणार

देशातील वाढती महागाई आटोक्यात आणण्यासाठी रिझर्व्ह बँक डिसेंबरपर्यंत रेपो रेटमध्ये 5.9 टक्क्यांपर्यंत वाढ करेल, असे भाकीत अमेरिकेतील फिच रेटींग्ज या संस्थेने केले आहे. बँकेकडून पुढील सहा महिन्यांत लागोपाठ व्याजदरवाढीचा धडाका लावला जाऊ शकतो. त्यामुळे सर्व प्रकारची कर्जे महाग होऊन सामान्य कर्जदारांना मोठा झटका बसणार आहे.