
दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारा एकमेव हिंदुस्थानी कुस्तीपटू असलेल्या सुशील कुमारने पुरेशा सरावाअभावी राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेतून माघार घेतली आहे. स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाशी (एसजीएफआय) सुरू असलेल्या वादामुळे माझ्या ऑलिम्पिकच्या तयारीसाठी एक महिना उशीर झाला आहे. मात्र लवकरच सरावाला सुरुवात करणार असून ऑलिम्पिकच्या पात्रतेसाठी सर्वस्व पणाला लावू, असा निर्धारही सुशीलने व्यक्त केला.
2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कास्य, तर 2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळविलेल्या सुशील कुमारने ‘एसजीएफआय’चे माजी सचिव राजेश मिश्रा यांच्यावर फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. मिश्रा यांनी माझी खोटी सही करून दोन ठिकाणांहून पैसे घेतले. अनेक खेळाडूंचीही माझ्याप्रमाणेच फसवणूक झालेली असेल.
कदाचित हा कोटय़वधी रुपयांचाही घोटाळा असू शकतो. ‘एसजीएफआय’मधील भ्रष्टाचार दूर करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. पण या भ्रष्टाचाराच्या लढाईत माझ्या सरावावर परिणाम झाला, मात्र या गोष्टीचा अधिक बाऊ न करता मी पुन्हा सरावाला सुरुवात करणार आहे. हिंदुस्थानी कुस्तीपटू टोकियो ऑलिम्पिकमध्ये नक्कीच दमदार कामगिरी करतील, असा विश्वासही सुशील कुमारने व्यक्त केला.




























































