वयचोर अन् राज्य बदलून खेळणारे कुस्तीपटू निलंबित,राष्ट्रीय कुस्ती महासंघाची 11 खेळाडूंवर तडकाफडकी कारवाई

राष्ट्रीय कुस्ती महासंघाने (डब्ल्यूएफआय) बनावट जन्म प्रमाणपत्र सादर केल्याच्या आरोपाखाली 11 कुस्तीपटूंना तडकाफडकी निलंबित केले आहे. दिल्ली महानगरपालिकेने (एमसीडी) 110 दस्तऐवजांची तपासणी केली असून त्यातील 11 प्रमाणपत्रे बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात वयाशी संबंधित फसवणूक आणि मूळ राज्य लपवून स्पर्धेत प्रवेश मिळवण्याचा प्रकार उघड झाला आहे. त्यामुळे ‘डब्ल्यूएफआय’ने ही मोठी कारवाई केली आहे.

हिंदुस्थानी कुस्ती क्षेत्र सध्या दोन मोठय़ा समस्यांशी झुंजत आहे. यात काही जास्त वयाचे खेळाडू अल्पवयीन गटांमध्ये खेळत आहेत, तर काही खेळाडू बनावट जन्म प्रमाणपत्र सादर करून इतर राज्यांचे प्रतिनिधित्व करत आहेत. ‘डब्ल्यूएफआय’ने संशयित कुस्तीपटूंच्या जन्म प्रमाणपत्रांची यादी दिल्ली महापालिकेला दिली होती. तपासणीनंतर एमसीडीने स्पष्ट केले की 95 विलंबित नोंदणी प्रमाणपत्रे उपविभागीय दंडाधिकारी (एडसीएम) यांच्या आदेशानेच जारी करण्यात आली होती. तसेच 11 प्रमाणपत्रे बनावट/पह्टोशॉपद्वारे बदललेली असून ती महापालिकेने जाहीर केलेली नाहीत, असे सांगण्यात आले आहे. विशेषतः राष्ट्रीय ज्युनियर संघ निवडीसाठी घेतल्या जाणाऱया चाचण्यांमध्ये काही खेळाडूंनी लहान वयोगटात प्रवेश मिळवून प्रामाणिक प्रतिस्पर्ध्यांवर अन्याय करून आघाडी घेतल्याचे दिसून आले आहे. काही प्रकरणांमध्ये जन्माच्या तब्बल 12 ते 15 वर्षांनंतर प्रमाणपत्र जाहीर करण्यात आलेले आढळले. ही शंका लक्षात घेता ‘डब्ल्यूएफआय’ने महापालिकेकडे सत्यतेसाठी यादी सादर केली होती.

हरियाणाचे कुस्तीपटू खेळले दिल्लीकडून

हरियाणा संघात स्थान मिळवणे अत्यंत कठीण झाले आहे. त्यामुळे अनेक खेळाडू बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे दिल्लीचे प्रतिनिधित्व करून स्पर्धेत भाग घेत आहेत. हे खेळाडू हरियाणाचे असूनही त्यांनी एमसीडीकडून दिल्लीसाठी जन्म प्रमाणपत्र मिळवले, हे ‘डब्ल्यूएफआय’ने तपासात उघड केले आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीची कुस्तीपटू रितिका हिच्या वडिलांनी क्रीडा मंत्रालयाला पत्र लिहून तक्रार केली आहे. त्यांनी आरोप केला आहे की, ‘हरियाणाची इशिका हिला दिल्लीतील राज्यस्तरीय स्पर्धेत 53 किलो वजनी गटात सहभागी होऊ दिले गेले, जे ‘डब्ल्यूएफआय’च्या मूळ रहिवासी धोरणाचे उल्लंघन आहे. नीरज कुमार यांनी पत्रात म्हटले आहे की, ‘इशिका दिल्लीसाठी खेळू शकत नाही. कारण ती हरियाणाची रहिवासी आहे. कृपया या प्रकरणाची चौकशी करून पारदर्शकता राखावी.’

या 11 खेळाडूंवर कारवाई

निलंबनाची कारवाई झालेल्या या 11 कुस्तीपटूंमध्ये सक्षम, मनुज, कविता, अंशु, आरुष राणा, शुभम, गौतम, जगरूप धनखड, नकुल, दुष्यंत आणि सिद्धार्थ बालयान यांचा समावेश आहे. यातील बर्याच प्रमाणपत्रांवर नरेला विभागाचा पत्ता आहे, तर काही प्रमाणपत्रे नजफगड, रोहिणी, सिव्हिल लाईन्स आणि सिटी झोन क्षेत्रातील आहेत. ‘डब्ल्यूएफआय’च्या एका अधिकाऱयाने एका वृत्तसंस्थेला सांगितले की, ‘या 11 पैकी सहा कुस्तीपटूंना आज (7 ऑगस्ट) निलंबनाची नोटीस पाठवण्यात आले आहे, तर उर्वरित पाच जणांना याआधीच निलंबित करण्यात आले आहे. आम्ही प्रणाली स्वच्छ ठेवण्याच्या प्रयत्नात आहोत.’ महापालिकेने हेही सांगितले की, ‘दोन खेळाडूंनी त्यांच्या नोंदणीच्या तारखांमध्ये फेरफार केला आहे, ज्याचा महापालिकेच्या नोंदींशी ताळमेळ बसत नाही.’